प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पंतप्रधानांसारखी सुरक्षा

सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्रालयाचा निर्णय !

नागपूर – केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यापूर्वी त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची ‘झेड प्लस’ सुरक्षा होती; मात्र आता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमाणे ‘झेड प्लस’हून अधिक म्हणजे ए.एस्.एल्. (ॲडवान्स सिक्युरिटी लिएजॉन) सुरक्षा देण्यात आली आहे.

त्यांना मिळणार्‍या ए.एस्.एल्. या सुरक्षायंत्रणेत देशातील कुठल्याही भागात प्रशासन, पोलीस, आरोग्य, अन्न आणि औषधी प्रशासन यांचा समावेश असणार आहे. कुठलाही धोका टाळण्यासाठी ‘मल्टी लेयर’ सुरक्षाप्रणाली त्यांना देण्यात येणार आहे. त्यांच्या रहाण्याच्या व्यवस्थेपासून ते प्रवास, भेटी आणि बैठका यांच्या स्थळांच्या ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था पाळण्यात येणार आहे. त्यांच्या दौर्‍यांपूर्वी सर्व ठिकाणी १ दिवस आधीच स्थळाचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे.

सरसंघचालकांची सुरक्षा वाढवण्याचे कारण काय ?

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे भारतविरोधी, तसेच भारतद्वेषी विविध संघटनांच्या निशाण्यावर आहेत. काही राज्यांमध्ये तर त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करण्यात आला होता. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने गृह मंत्रालयाने प्रथमच त्यांना ‘ए.एस्.एल्.’ सुरक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.