पूर्णपुरुषोत्तम पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण !

आज ‘गोपाळकाला’ आहे.त्या निमित्ताने…


पूर्णपुरुषोत्तम पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण !
ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्दविग्रहः ।
अनादिरादिर्गाेविन्दः सर्वकारणकारणम् ।।
– ब्रह्मसंहिता, श्लोक १

अर्थ : श्रीकृष्ण परम ईश्वर आहे. त्याचा श्रीविग्रह नित्य, चित्घन आणि आनंदस्वरूप आहे. तो अनादि, सर्वश्रेष्ठ आणि सर्व कारणांचा कारणस्वरूप गोविंद आहे.

आपली इंद्रिये ही मर्यादित आहेत, म्हणजे हाताचे काम फक्त हातच करू शकतात. डोळ्यांचे काम पहाण्याचे जे डोळेच करू शकतात. इथे मानवी इंद्रियांची मर्यादा लक्षात येते; पण भगवान श्रीकृष्णाविषयी असे नाही. त्याची कोणतीही इंद्रिये कोणतीही कार्ये करू शकतात, म्हणजे डोळे हाताचे कार्य करू शकतात आणि हात डोळ्यांचे पहाण्याचे कार्य करू शकतात. याची पुष्टी पुढीलप्रमाणे आहे.

अङ्गानि यस्य सकलेन्द्रियवृत्तिमन्ति ।
पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरं जगन्ति ।
आनन्दचिन्मयसदुज्ज्वलविग्रहस्य ।
गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ।।
– ब्रह्मसंहिता, अध्याय ५, श्लोक ३२

अर्थ : ज्याच्या दिव्य स्वरूपाच्या प्रत्येक अवयवामध्ये जो स्वतः पूर्णत्वाने समाविष्ट आहे, ज्याची इंद्रिये सदासर्वकाळ भौतिक आणि आध्यात्मिक अशी अनंत ब्रह्मांडे पहातात, सांभाळतात आणि प्रकट करतात, अशा तेजस्वी सच्चिदानंद स्वरूपाचे, त्या श्री गोविंदाचे म्हणजेच आदिपुरुषाचे मी पूजन करतो.

२६ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘श्रीकृष्ण म्हणजे पूर्णावतार आणि श्रीकृष्ण पूर्णावतार असल्याचे दर्शवणारी वैशिष्ट्यां’मधील काही वैशिष्ट्ये वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

मागील भाग येथे वाचा -https://sanatanprabhat.org/marathi/828254.html

२. श्रीकृष्ण पूर्णावतार असल्याचे दर्शवणारी वैशिष्ट्ये !

२ ग. धर्म रक्षणकर्ता : ‘धर्मो रक्षति रक्षितः ।’ (मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५)

म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म (ईश्वर) रक्षण करतो.’ महाभारत युद्धाच्या वेळी प्रत्येकाने स्वतःची प्रतिज्ञा आणि प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. महारथी कर्णाने दानशूरत्वाची, पितामह भीष्मांनी कौरवांच्या सिंहासनासाठी घेतलेली प्रतिज्ञा आणि आजीवन ब्रह्मचर्य अन् इतरांनी अनेक आपल्या आपल्या प्रतिज्ञा आयुष्यभर पाळल्या; परंतु युद्धाच्या आरंभी ‘न धरी करी शस्त्र मी, सांगेन चार गोष्टी चार युक्तीच्या’, या  स्वतःच्या प्रतिज्ञेला युद्धात मोडणारा आणि भीष्म पितामहांवर रथाचे चक्र घेऊन धावणारा हाच धर्म रक्षणकर्ता भगवान श्रीकृष्ण !

२ घ. कर्मयोगी श्रीकृष्ण :

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक १४

अर्थ : कर्मांच्या फळांची मला इच्छा नाही. त्यामुळे कर्मे मला लिप्त करत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो, त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही.

जीवनभर कर्मयोगाचा आदर्श ठेवणारा आणि त्यानुसारच आचरण ठेवणारा महान कर्मयोगी !

२ च. कूटनीतीज्ञ आणि राजनीतीज्ञ : महाभारत युद्धाच्या वेळी कर्णाला त्याचे जन्मवृत्तांत सांगून पांडवांच्या बाजूला घ्यायचे प्रयत्न करणारा, जरासंधाला १७ वेळा पराभूत करून त्याच्या सर्व सैन्याचा संहार करून त्याला मात्र जिवंत सोडणारा (पृथ्वीवरील अनावश्यक भार उतरवणारा), युद्ध होऊ नये म्हणून शिष्टाई करणारा, भीष्म पितामहांवर रथचक्र घेऊन जाणारा, कालयवनाला जिवंत सोडणारा आणि पलायन करणारा…! इतिहासात भगवान श्रीकृष्णानंतर अशी नीती फक्त आर्य चाणक्य नि छत्रपती शिवाजी महाराज यांनी सार्थपणे अनुसरली.

२ छ. आत्मकाम पूर्णकाम श्रीकृष्ण : जगत्जननी माता रुक्मिणीशी विनोद करतांना तिला भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

उदासीना वयं नूनं न स्त्र्यपत्यार्थकामुकाः
आत्मलब्ध्याऽस्महे पूर्णा गेहयोर्ज्योतिरक्रियाः ।।

– श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय ६०, श्लोक २०

अर्थ : आम्ही खरोखरच देह आणि घरदार यांविषयी उदासीन आहोत. स्त्री, संतान आणि धन यांची आम्हांला आकांक्षा नाही. आम्ही निष्क्रिय असून दिव्यासारखे साक्षीदार आहोत. आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच पूर्णकाम आहोत.

२ ज. गोपालक श्रीकृष्ण : भगवान श्रीकृष्ण हे गायीचे पूजक होते; म्हणून त्यांना ‘गोपालक’ म्हणतात.

अशा या पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या गोपाळकाल्याच्या दिनाच्या निमित्ताने आपण या पुरुषोत्तमाचे स्मरण करून जीवन त्यालाच समर्पित करू.

वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयम् ।
सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तु ते ।।

अर्थ : तिन्ही लोक वासुदेवाच्या अस्तित्वाने भरून राहिले आहेत, सर्व प्राणिमात्रांमध्ये त्याचा निवास आहे. अशा वासुदेवाला माझा नमस्कार असो.

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।।

अर्थ : वसुदेवाचा पुत्र, तसेच कंस, चाणूर इत्यादींचा निःपात करणार्‍या, देवकीला परमानंद देणार्‍या आणि संपूर्ण जगताला गुरुस्थानी असणार्‍या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो.

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ।।

अर्थ : वसुदेवपुत्र कृष्णाला, सर्व दुःखे हरण करणार्‍या परमात्म्याला आणि शरणागतांचे क्लेश दूर करणार्‍या गोविंदाला माझा नमस्कार असो.

– श्री. तुकाराम चिंचणीकर, पंढरपूर, जिल्हा सोलापूर.   (समाप्त)

(श्री. तुकाराम चिंचणीकर यांच्या ब्लॉगवरून साभार)