गणेशोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर येथून २४५ एस्.टी. गाड्या जाणार ! – पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी

छत्रपती संभाजीनगर, २५ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे. या उत्सवात मुंबईतून कोकणात जाणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी एस्.टी. महामंडळाच्या वतीने राज्य स्तरावर मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येते. या अंतर्गत गणेशोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर येथून २४५ एस्.टी. गाड्या जाणार आहेत, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी पंडित चव्हाण यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी बोलतांना दिली.

१. संभाजीनगर विभागासाठी २१४ ‘ई-बस’ची मागणी आम्ही केली आहे. ‘ई-बस’साठी ‘चार्जिंग स्टेशन’चे (भारीत करण्याचे ठिकाण) काम युद्धपातळीवर चालू आहे. संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत येणार्‍या ८ ठिकाणांच्या अंतर्गत ४ ठिकाणी पहिल्या टप्प्यात ही उभारणी करण्यात येत आहे. यानंतर कन्नड आणि गंगापूर येथे उभारण्यात येणार आहे. सोयगाव सध्या प्रस्तावित नसून शहर बसस्थानकाच्या ‘चार्जिंग स्टेशन’ची जागा ही रेल्वेस्थानक परिसरात असून त्यांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यावर लवकरच हे काम चालू होईल.

२. पहिल्या टप्प्यात सिडको येथे चालू असलेले काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी आशा असून १ ऑक्टोबरपासून हे स्थानक कार्यान्वित होईल. यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

३. याचसमवेत साधारणत: २०० नवीन बसगाड्या दिवाळीपर्यंत संभाजीनगर विभागाला मिळतील, अशी अपेक्षा आहे.