आज ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्दविग्रहः ।
अनादिरादिर्गाेविन्दः सर्वकारणकारणम् ।।
– ब्रह्मसंहिता, श्लोक १
अर्थ : श्रीकृष्ण परम ईश्वर आहे. त्याचा श्रीविग्रह नित्य, चित्घन आणि आनंदस्वरूप आहे. तो अनादि, सर्वश्रेष्ठ आणि सर्व कारणांचा कारणस्वरूप गोविंद आहे.
आपली इंद्रिये ही मर्यादित आहेत, म्हणजे हाताचे काम फक्त हातच करू शकतात. डोळ्यांचे काम पहाण्याचे जे डोळेच करू शकतात. इथे मानवी इंद्रियांची मर्यादा लक्षात येते; पण भगवान श्रीकृष्णाविषयी असे नाही. त्याची कोणतीही इंद्रिये कोणतीही कार्ये करू शकतात, म्हणजे डोळे हाताचे कार्य करू शकतात आणि हात डोळ्यांचे पहाण्याचे कार्य करू शकतात. याची पुष्टी पुढीलप्रमाणे आहे.
अङ्गानि यस्य सकलेन्द्रियवृत्तिमन्ति । पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरं जगन्ति ।
आनन्दचिन्मयसदुज्ज्वलविग्रहस्य । गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ।।
– ब्रह्मसंहिता, अध्याय ५, श्लोक ३२
अर्थ : ज्याच्या दिव्य स्वरूपाच्या प्रत्येक अवयवामध्ये जो स्वतः पूर्णत्वाने समाविष्ट आहे, ज्याची इंद्रिये सदासर्वकाळ भौतिक आणि आध्यात्मिक अशी अनंत ब्रह्मांडे पहातात, सांभाळतात अन् प्रकट करतात, अशा तेजस्वी सच्चिदानंद स्वरूपाचे, त्या श्री गोविंदाचे म्हणजेच आदिपुरुषाचे मी पूजन करतो.
अशा या परमावतार पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा आज जन्मदिवस ! श्रावण कृष्ण अष्टमी !
१. श्रीकृष्ण म्हणजे पूर्णावतार
‘कर्षयति इति कृष्णः ।’ (जो आकर्षित करतो तो कृष्ण ) ‘कृ’ या संस्कृत धातूपासून कृष्ण हा शब्द आला आहे. श्रावण कृष्ण अष्टमीला रात्री १२ वाजता वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. वसुदेव म्हणजे विशुद्ध विवेक आणि देवकी म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा. या दोघांच्या पोटी आनंदकंद परब्रह्म सच्चिदानंद प्रकट झाले. दुष्टांचा संहार आणि सुष्टांचे रक्षण करण्यासाठी हा पूर्णावतार प्रकट झाला. इतर सर्व अवतारांपैकी फक्त हाच अवतार पूर्ण अवतार मानला जातो. श्रीमद्आद्यशंकराचार्यांनी सुद्धा ‘कृष्णस्तु भगवान् स्वयम् ।’, म्हणजे ‘श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत’, अशी पुष्टी केलेली आहे.
सर्वोत्कृष्ट पुत्र, पिता, प्रशासक, राजनीतीज्ञ, कुशल संघटक, तत्त्ववेत्ता, कूटनीतीज्ञ अशी त्याची वैशिष्ट्ये. सर्वच विषयांमध्ये पूर्ण असे हे व्यक्तीमत्त्व. षड्गुणऐश्वर्यसंपन्न (यश, कीर्ती, सामर्थ्य, सौंदर्य, श्री आणि वैराग्य ) असा तो परब्रह्म परमात्मा. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे मुख्य आधार ‘श्रीमद्भागवतपुराण’, ‘गर्गसंहिता’ आणि ‘महाभारत’ आहेत. इतर पुराणेही आहेतच. ‘श्रीमद्भागवतपुराण’ १२ स्कंधांचे असून यातील १० व्या स्कंधात भगवान श्रीकृष्णाचे चरित्र येते. यात ९० अध्याय असून पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे. त्याप्रमाणे ‘गर्गसंहिता’ विस्तृत प्रमाणात चरित्र प्रतिपादन करते. हा अवतार ‘पूर्णावतार’ कसा ते येथे देत आहे.
२. श्रीकृष्ण पूर्णावतार असल्याचे दर्शवणारी वैशिष्ट्ये !
२ अ. अवतरण : श्रावण कृष्ण अष्टमीला वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी रात्री १२ वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्मतःच चतुर्भुज रूपात वसुदेव आणि देवकी यांच्यासमोर रूप दाखवले. यातून त्याने दाखवून दिले, ‘मी भगवान विष्णु आहे.’ या वेळी वसुदेव आणि देवकी यांना स्वतः दिलेल्या वरदानाची आठवणही करून दिली. जन्मतःच श्रीकृष्णाच्या मुखावर हास्य विलसत होते.
२ आ. बाललीला : श्रीकृष्णाच्या बाललीला, म्हणजे भागवत धर्माचे परमरहस्य आहे. स्वतःच्या नटखट बाललीलांनी अवघ्या विश्वाला मोहिनी घालणारा हा परब्रह्म परमात्मा गोकुळात राहिला. शकट, यमलार्जुन वृक्ष, विषपान देणारी पुतना राक्षसीण या सर्वांचा उद्धार, यशोदेला मुखामध्ये अखिल ब्रह्मांडाचे दर्शन या आणि अशा कित्येक लीलांचा समावेश होतो.
२ इ. लोणीचोरी : असे म्हणतात की, श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी त्याचे भविष्य सांगणार्या गर्गऋषींनी असे भविष्य वर्तवले, ‘हा मोठेपणी पुष्कळ मोठा चोर (चित्तचोर) होईल; कारण तो लोणी चोरेल आणि सगळ्यांची मनेही चोरेल.’ या कृतीमागे भगवंताची भक्तांविषयीची प्रेमासक्ती दिसून येते.
२ ई. चीरहरण लीला : यमुनेच्या पाण्यात विवस्त्र स्नान करणार्या गोपींची वस्त्रहरण लीला हा टीकाकारांसाठी टीकेचा विषय आहे; पण ज्यांच्या मनात कामक्रोधादी षड्रिपू वसतात, त्यांनाच यावर टीका करावीशी वाटते. ७ वर्षांच्या मुलामध्ये कामवासनेचा लवलेश असणे शक्य तरी आहे का ? भगवान श्रीकृष्णाने या लीलेमध्ये गोपींची वस्त्रे चोरली. त्या विवस्त्र स्नान करत होत्या. या लीलेचा आध्यात्मिक अर्थ असा आहे, ‘तुम्हाला जर ईश्वराला भेटायचे असेल, तर स्वतःच्या मनावरचे अहंकार आणि इतर वासना यांची मलीन वस्त्रे काढा, तर आणि तरच तुम्ही ईश्वरापर्यंत पोचू शकाल.’ याचा अर्थ ईश्वरप्राप्तीसाठी कामक्रोधादी षड्रिपू त्यागणे आवश्यक आहे. गोपींच्या वस्त्रांची तुलना स्वतःच्या मनातील कामक्रोधादी षड्रिपूंशी करावी, म्हणजे शंका उरणार नाही.
२ उ. रासलीला – रासरासेश्वर भगवान श्रीकृष्ण : रासलीलेचा अर्थ आध्यात्मिकदृष्ट्या समजून घेण्यासारखा आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने गोपींसह रासलीला केली. ‘गोपी’ शब्दाचा अर्थ ‘गोभिः रसं पिबति इति गोपी’, म्हणजे ‘ज्या (सर्व) इंद्रियांनी (भक्ती) रस पितात त्या गोपी’, असा आहे. ‘गो’ म्हणजे इंद्रिये. रासलीलेमध्ये भगवंताने आपल्या अधारांनी बासरी वाजवली आणि त्या मधुर निनादाने गोपी धावत श्रीकृष्णाला भेटायला आल्या. कुणी भोजन करत होत्या, कुणी आपल्या नवर्याला जेवू घालत होत्या, कुणी बाळाला दूध पाजत होत्या, कुणी थोरांची सेवा करत होत्या, तर कुणी इतर काही कामे करत होत्या. त्या गोपी भगवंताला भेटताच भगवंताने येण्याचे कारण विचारले आणि ‘रात्रीची वेळ आहे’, असे सांगून परत जायला सांगितले; पण ज्यांनी स्वतःची मने पूर्णतः गोविंदाच्या चरणारविंदावर समर्पित केली होती, त्या गोपी निराश झाल्या. नंतर विनवणी करताच गोविंदाने अनुमती दिली आणि रासलीलेला प्रारंभ झाला.
यात काही टीकाकारांना कामक्रीडा दिसते; पण हे असत्य आहे. कारण वर दिलेच आहे. तरीही काही जण म्हणतील, ‘भगवान श्रीकृष्ण हे सर्व अवस्थांमध्ये समान आहेत, मग ते बालपणीचे आणि प्रौढ वयातील सारखेच’; पण याला ‘भागवता’मध्ये स्पष्ट उत्तर आहे, ‘गोपी जरी भगवान श्रीकृष्णावर कामासक्त होत्या, तरी त्यांच्या कामासक्तीचे रूपांतर शुद्ध प्रेमात झाले.’ हेच या लीलेचे तात्पर्य आणि ध्येय आहे. रासलीलेचा आध्यात्मिक अर्थ असा आहे, ‘वृंदावन म्हणजे स्वतःचे अंतःकरण. श्रीकृष्ण म्हणजे स्वतःचा आत्मा. श्रीकृष्णाच्या बासरीचा स्वर, म्हणजे स्वतःच्या अंतःकरणात निघणारा अनाहत ध्वनी जो योगी लोकांना ऐकू येतो. या ध्वनीने निर्माण होणार्या अंतःकरणातील भावना आणि तरंग म्हणजे गोपी. या तरंगांचा आत्म्याशी होणार्या मिलनाचे साधर्म्य रासलीलेशी आहे; कारण ‘जीवन एक महारास आहे आणि भगवान श्रीकृष्णाशी होणारी ही रासक्रीडा हीच मनुष्य जीवनाची अंतिम पराकाष्ठा अन् परम ध्येय आहे.’
२ ऊ. वृंदावनबिहारी :
बर्हापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णीकारं
बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालाम् ।
रन्ध्रान्वेणोरधरसुधयापूरयन्गोपवृन्दैर्
वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्ती : ।।
– श्रीमद्भागवत, स्कन्ध १०, अध्याय २१, श्लोक ५
अर्थ : भगवान श्रीकृष्णाने आपल्या गोपमित्रांसह वृंदावनात प्रवेश केला आहे. त्याच्या मस्तकावर मोरपीस आहे, कानांवर कणेरीची पिवळी फुले आहेत. त्याने शरिरावर सोन्यासारखा पितांबर परिधान केला असून गळ्यात वैजयंती माळ आहे. त्याचे रूप श्रेष्ठ नटापेक्षाही किती सुंदर आहे बरे ! बासरीची छिद्रे ते स्वतःच्या अधरामृताने भरत आहेत. गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करत आहेत. हे वृंदावन त्यांच्या चरणांमुळे अधिकच रमणीय झाले आहे.
२ ए. कंसवध : आपल्या सख्ख्या मामाचा श्रीकृष्णाने वध केला; कारण तो अन्यायी होता. एवढेच नव्हे, तर त्याला श्रीकृष्णाने सायुज्य मोक्षही दिला आणि त्याचे राज्य जिंकूनही स्वतः उपभोगले नाही, तर ते स्वतःच्या आजोबांना शूरसेन यांना दिले.
२ ऐ. रणछोड श्रीकृष्ण : कंसवध केल्याने चिडून त्याच्या सासर्याने, म्हणजेच जरासंधाने १७ वेळा स्वतःच्या २१ अक्षौहिणी सेनेसह मथुरेवर आक्रमण केले. भगवान श्रीकृष्णाने त्याची सगळी आक्रमणे परतवून लावली; पण १८ व्या आक्रमणाच्या वेळी कालयवन नावाच्या एका यवनाचेही आक्रमण मथुरेवर चालून आले. या दोन्ही आक्रमणांचा सामना करतांना भगवान श्रीकृष्णाने युक्ती लढवली. दोन्ही सैन्याची अपरिमित हानी करूनही जरासंध आणि कालयवन यांना जिवंत सोडले अन् कालयवनाच्या समोरून एका पळपुट्याप्रमाणे रणक्षेत्र सोडून श्रीकृष्ण पळून गेला. कालयवनाने धिक्कार केला; मात्र यामागे राजकीय हेतू होता. कालयवनाने आणलेली अमाप संपत्ती जर यदुवंशियांच्या हाती लागली असती, तर सर्व यादव हे संपत्तीच्या मदाने अहंकारी झाले असते आणि दुसरे असे की, कालयवनाचा मृत्यू त्याच्या हातून नव्हता.
२ ओ. रुक्मिणी स्वयंवर : भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह म्हणजे रुक्मिणी स्वयंवर ! आनंदकंद परमात्मा मायापती ब्रह्मांडनायक आणि चित्शक्ति आदिमाया परब्रह्मस्वरुपिणी माता लक्ष्मी यांचा अनुपम संगम !
२ औ. १६ सहस्र नारींचा पती : ‘पाति इति पति ।’, म्हणजे ‘जो रक्षण करतो तो पती’. नरकासुराच्या कैदेतून १६ सहस्र नारींचा रक्षणकर्ता…! नरकचतुर्दशीला नरकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या कारावासात डांबलेल्या १६ सहस्र महिलांना जेव्हा त्यांच्या घरच्यांनी आणि समाजानेही नाकारले, तेव्हा त्यांना स्वीकारून त्यांना अभय देणारा हा पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण ! १६ सहस्र महिलांनी श्रीकृष्णाला पती मानले आणि श्रीकृष्णानेही त्या मुलींना स्वतःचे नाव दिले.
२ अं. भगवद्गीतेचा रचयिता : कुरुक्षेत्रावर किंकर्तव्यमूढ झालेल्या सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाला कर्मयोगाचे अलौकिक तत्त्वज्ञान सांगणारा आणि युद्धास प्रवृत्त करणारा परमेश्वर ! धनंजय अर्जुनाला विश्वरूप दाखवणारा आणि शेवटी ‘तू युद्ध कर’, असे ठणकावून सांगणारा…!
२ क. निरहंकारी भगवान श्रीकृष्ण : पांडवांच्या राजसूय यज्ञात सर्वांना वेगवेगळी कामे वाटून देऊन स्वतः मात्र आलेल्या अतिथींचे पादप्रक्षालन करणारा ! ज्याचे चरणकमल अंतःकरणात धारण करून योगी विमलाशय होतात, ज्याचे चरणकमल देवादिकांना ही दुर्लभ आहेत तो इतरांचे पादप्रक्षालन करत होता !
(क्रमश:)
– श्री. तुकाराम चिंचणीकर, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. (श्री. तुकाराम चिंचणीकर यांच्या ब्लॉगवरून साभार)