छत्रपती संभाजीनगर येथील ‘अजिंठा अर्बन बँके’तील कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचे प्रकरण !

‘अजिंठा अर्बन बँके’च्या ८ अधिकार्‍यांना अटक, संचालकांवर कारवाई नाही !

छत्रपती संभाजीनगर – शहरातील ‘अजिंठा अर्बन बँके’त संगनमताने ९७ कोटी ३९ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२३ मध्ये बँकेचे तत्कालीन प्रशासक सुरेश काकडे यांनी बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी अन् कर्मचारी यांच्या विरोधात ऑक्टोबर २०२३ मध्ये तक्रार दिली होती. त्यावर आर्थिक गुन्हे शाखेने ११ महिन्यांनंतर म्हणजे २१ ऑगस्ट २०२४ या दिवशी ८ अधिकार्‍यांना अटक केली; मात्र संचालकांना पोलिसांनी अटक केलेली नाही. संचालकांना पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. (तक्रार प्रविष्ट करून अटकेची कारवाई करण्यास ११ महिन्यांचा कालावधी का लागला ? ही पोलिसांची कार्यक्षमता आहे का ? – संपादक)

१ मार्च २००६ ते ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीत अपहार झाल्याचे निदर्शनास आले होते. काकडे यांनी तक्रार दिल्यानंतर १८ ऑक्टोबर २०२३ या दिवशी गुन्हा नोंद केला होता. त्यावरून मुख्य व्यवस्थापक संदेश वाघ, सोपान डमाळे, गणेश दांगोडे, ज्ञानेश्वर उपाख्य शरद पवार, पोपट साखरे, राजू बाचकर, प्रशांत फळेगावकर (देशमुख), कल्याण दांगोडे यांना अटक करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप एकनाथ कुलकर्णी, सनदी लेखापाल, अधिकारी आणि कर्मचारी यांनी संगनमत करून अफरातफर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संचालकांना अटक का होत नाही ?

‘आदर्श बँक घोटाळ्यातील संचालकांना अटक करण्यात आली. त्याप्रमाणेच ५०० ते ६०० कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात अजिंठा अर्बन बँकेच्या संचालकांना अटक करण्यासाठी पोलीस पुढाकार का घेत नाहीत ? ते दोषी संचालकांना पाठीशी घालत आहेत का ? सर्व दोषी संचालकांना कठोर शिक्षा झाली, तर पुढे बँका असे घोटाळा करण्यास धजावणार नाहीत’, असे ठेवीदार मंगेश कोपते म्हणाले.