156 FDCs banned : केंद्र सरकारकडून १५६ औषधांवर बंदी !

नवी देहली – ताप, सर्दी, अ‍ॅलर्जी आणि वेदना अल्‍प करणे यांसाठी वापरल्‍या जाणार्‍या १५६ ‘फिक्‍स्‍ड डोस कॉम्‍बिनेशन’ (एफ्.डी.सी.) औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार नाहीत. ही औषधे आरोग्‍यासाठी धोकादायक ठरू शकतात, असे केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने जारी केलेल्‍या अधिसूचनेत म्‍हटले आहे.

१. एफ्.डी.सी. ही अशी औषधे आहेत, जी २ किंवा अधिक औषधे निश्‍चित प्रमाणात मिसळून बनवली जातात. सध्‍या अशा औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्‍यांना ‘कॉकटेल’ औषधेही म्‍हणतात.

२. पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, तारिन आणि कॅफिन यांच्‍या मिश्रणावरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ट्रामाडोल हे वेदना न्‍यून करणारे औषध आहे.

३. केंद्राने नेमलेल्‍या तज्ञ समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती. औषध तांत्रिक सल्लागार मंडळानेही ‘एफ्.डी.सी.’चे परीक्षण केले आणि त्‍यावर बंदी घालण्‍याची शिफारस केली.

४. गेल्‍या वर्षी जूनमध्‍येही १४ ‘एफ्.डी.सी.’वर बंदी घालण्‍यात आली होती. सरकारने वर्ष २०१६ मध्‍ये ३४४ ‘एफ्.डी.सी.चे उत्‍पादन, विक्री आणि वितरण यांवर बंदी घालण्‍याची घोषणा केली होती. या निर्णयाला औषध आस्‍थापनांनी न्‍यायालयात आव्‍हान दिले होते.