श्रावण मास येता मन उत्साही होई।
श्रावणात ऊन-पावसाचा खेळ चालू होई।। १।।
पावसाच्या धारा मोत्यांच्या माळांप्रमाणे भासती।
या टपोर्या मोत्यांना सूर्यकिरण भेदून जाती।। २।।
काळ्या नभातून धावणारे सूर्यबिंब विलोभनीय दिसे।
नभोमंडपात इंद्रधनुष्याचे सप्तरंगी तोरण शोभून दिसे।। ३।।
वार्याने डोलतात हिरवीगार कुरणे।
ती पाहून फिटते डोळ्यांचे पारणे।। ४।।
सूर्याचे किरण सायंकाळी कलतात।
अन् रंगीबेरंगी किरण आकाशात पसरतात।। ५।।
आषाढ, श्रावण, भाद्रपद अन् कार्तिक हे असती चातुर्मास।
व्रत-वैकल्यांमुळे भरतो चातुर्मासात नवोल्हास।। ६।।
श्रावणात सर्वत्र हिरवीगार वनराई शोभून दिसे।
निसर्गसौंदर्य पाहून मन आनंदाने बागडत असे।। ७।।
नदी अन् नाले यांतून पाणी ओसंडून वहाते।
धबधब्यांमध्ये खेळतांना खूपच मजा येते।। ८।।
पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून मन प्रसन्न होते।
फुलपाखरांचे बागडणे पाहून मन प्रफुल्लित होते।। ९।।
जाई-जुईच्या वेलींना येतो सुंदर बहर।
त्यांच्या गोड सुगंधाने दरवळतो संपूर्ण परिसर।। १०।।
श्रावण मास विविध सणांनी नटलेला आहे।
अन् निसर्गसौंदर्याने ओतप्रोत भरलेला आहे।। ११।।
नारळीपौर्णिमेच्या पूजनाने सागर शांत होई।
नारळीभाताचा प्रसाद खाऊन मन तृप्त होई।। १२।।
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाची वाट पाही।
राखीच्या रूपाने दोघेही रेशमी बंधनात बांधले जाती।। १३।।
गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची आठवण येई।
सर्व बाळगोपाळांमध्ये बाळकृष्णाचे दर्शन होई।। १४।।
गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी फोडली जाई।
दहीपोह्याचा प्रसाद खाऊन कृष्णलीलांचे स्मरण होई।। १५।।
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.८.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |