भारतीय संगीतातील ताल आणि पाश्चात्त्य संगीतातील ताल यांत जाणवलेला भेद

गायनसाधना

१. प्रकृतीशी निगडित असलेले भारतीय संगीतातील ताल

 १ अ. भारतीय संगीतातील तालपद्धतीनुसार सर्व ताल चक्राकार गतीने फिरत पुन्हा मूळ स्थानी, म्हणजेच प्रथम मात्रेवर येत असणे : ‘काल हे एक चक्र आहे. भारतीय संगीतातील ताल (टीप १) हे कालचक्राचे प्रतीक आहे. भारतीय संगीतातील तालपद्धतीनुसार सर्व ताल चक्राकार गतीने फिरत पुन्हा मूळ स्थानी, म्हणजेच प्रथम मात्रेवर येतात. अशा प्रकारे ही आवर्तनाची (टीप २) प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अव्याहतपणे अनंत काळापर्यंत चालूच रहाते, उदा. ‘केरवा’ या तालात एकूण ८ मात्रा आहेत. या १-२-३-४, ५-६-७-८ अशा मात्रा आहेत. यात आठव्या मात्रेनंतर पुन्हा पहिली मात्रा मोजली जाते. ज्याप्रमाणे उत्पत्ती, त्यानंतर स्थिती आणि लय, असे टप्पे असतात आणि लयानंतर पुन्हा विश्वाची निर्मिती होते, त्याप्रमाणे संगीतातील तालातही शेवटच्या मात्रेनंतर पुन्हा पहिली मात्रा चालू होते. अशा प्रकारे भारतीय संगीतातील तालपद्धत ही प्रकृतीशी निगडित आहे.

(टीप १ – ताल : नियमबद्ध मात्रांचा समूह म्हणजे ‘ताल.’

 टीप २ – आवर्तन : तालाच्या पहिल्या मात्रेपासून क्रमशः जाऊन पुन्हा पहिल्या मात्रेवर येण्याच्या क्रियेस ‘आवर्तन’ असे म्हणतात. )

१ आ. तालामध्ये येणारा ‘काल’ : भारतीय तालपद्धतीत ‘काल’ (टीप ३) येतो. त्याला ‘खाली’ असेही म्हणतात. हा काल शक्यतो तालाच्या मध्ये येतो. ‘हा काल म्हणजे पोकळी आहे’, असे मला वाटले.

(टीप ३ – काल किंवा खाली : तालातील दुसर्‍या प्रमुख मात्रेस ‘काल’ असे म्हणतात. कालाची मात्रा ही तालाच्या दुसर्‍या अर्ध्या भागाची आरंभीची मात्रा असते.)

१ इ. भारतीय शास्त्रीय संगीतातील गाणे वेगवेगळ्या मात्रेपासून चालू होते. त्याला ठराविक असे नियम आहेत.

१ ई. भारतीय तालपद्धतीत ‘सम’ गाठणे, म्हणजेच मूळ तत्त्वाशी पुन्हा भेट होणे आणि अशा प्रकारे समेवर आल्याने गायक अन् वादक यांना आत्मिक आनंद मिळत असणे : भारतीय तालपद्धतीत ‘सम’ असते. ‘सम’ म्हणजे तालाची पहिली मात्रा होय. या समेवर योग्य प्रकारे पोचल्यावर गायक आणि वादक यांना आत्मिक आनंद मिळतो. ‘मूळ तत्त्वातून (ब्रह्मातून) पतन (विलग) होऊन पुन्हा मूळ तत्त्वात विलीन होणे, म्हणजेच मोक्ष मिळवणे’, हा सृष्टीचा नियम आहे. भारतीय तालपद्धतीतील ‘सम’ गाठणे, म्हणजेच त्या मूळ तत्त्वाशी पुन्हा भेट होणे आहे. तेव्हा गायकाला पूर्णत्वाची अनुभूती येते.

२. मूळ स्थानापासून दूर जाणारे पाश्चात्त्य संगीतातील ताल

२ अ. पाश्चात्त्य संगीतात ताल अनंत असणे : पाश्चात्त्य संगीतातील ताल हे अधिक लांबीच्या रेषेप्रमाणे (linear) आहेत. पाश्चात्य संगीतातील तालपद्धतीत ठराविक ‘बिट्स’ (मात्रा) सलगतेने (कंटिन्युअसली) चालूच असतात; कारण यात ताल अनंत असतो. हा ताल मूळ स्थानापासून, म्हणजेच पहिल्या ‘बिट’ पासून (मात्रेपासून) पुढे दूर जातो. त्याला अंत नसतो. या पद्धतीत ताल पुन्हा मूळ स्थानी (म्हणजे समेवर) येत नाही. ही मूळ स्थानापासून दूर नेणारी तालपद्धत आहे.

२ आ . या तालपद्धतीत गाणे कुठूनही उचलता येते, म्हणजे गायनास कुठूनही प्रारंभ करता येतो.

२ इ. पाश्चात्त्य संगीतातील तालपद्धत, म्हणजे ‘मूळ मात्रेपासून (उत्पत्तीपासून) लांब नेणे, म्हणजे मायेकडे नेणे’, असेही म्हणू शकतो. आसुरी शक्तींनी याची रचना तशीच केली आहे.

– एक साधिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.८.२०२२)