प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्री. शंकर नरुटे (वय ४० वर्षे) !

श्रावण कृष्ण द्वितीया (२१.८.२०२४) या दिवशी श्री. शंकर नरुटे यांचा ४० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. शंकर नरुटे

 श्री. शंकर नरुटे यांना त्यांच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. एक साधिका

१ अ. साधकांना अडचण आल्यास तत्परतेने साहाय्य करणे : ‘एखाद्या साधकाला शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रास होत असल्यास ते शंकरदादांच्या लगेच लक्षात येते आणि ते त्या साधकांना तत्परतेने साहाय्य करतात. ‘आश्रमातील साधक हे प.पू. गुरुदेवांचे समष्टी रूप आहे’, असा दादांचा भाव असतो.

१ आ. दादांना सेवा करतांना ऊन-पाऊस, थंडी-वारा यांचे भान नसते. त्यांना सेवा करतांना भूकेची जाणीव नसते.

१ इ. साधकांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ : दादा आमच्या सेवेचा आढावा घेतात. ते काही साधकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. ते प्रत्येक साधकामधील गुण-दोष जाणतात. ‘साधकांनी कसे प्रयत्न केल्याने ते साधनेत पुढे जाऊ शकतात’, याविषयी दादा अत्यंत तळमळीने सांगतात.

१ ई. भाव : ‘आश्रमातील प्रत्येक पदार्थ गुरुदेवांसाठी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी) सिद्ध होत आहे’, असा दादांचा भाव असतो. त्यामुळे ‘पदार्थ चांगलाच व्हायला हवा’, असे त्यांना वाटते.

‘शंकरदादांमधील ‘गुरुकार्याची तळमळ आणि समर्पित भावाने सेवा करणे’, हे गुण आम्हाला आत्मसात करता येऊ देत. साधनेत पुढे जाण्यासाठी आम्हाला त्यांचा लाभ करून घेता येऊ दे’, हीच गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी प्रार्थना !’

२. सौ. लक्ष्मी पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३४ वर्षे)

सौ. लक्ष्मी पाटील

२ अ. प्रेमभाव

१. ‘माझ्या सासर्‍यांच्या (श्री. कृष्णा पाटील, वय ६६ वर्षे) आजारपणामुळे माझे यजमान (देवद आश्रमात बांधकाम विभागात सेवा करणारे श्री. नारायण पाटील) आणि मी अधिक काळ गावाला असतो. तेव्हा शंकरदादा आम्हाला भ्रमणभाष करून आमची विचारपूस करतात आणि आमच्याशी साधनेविषयी बोलतात.

२. आमच्या कुटुंबियांनाही ‘साधकांचा सत्संग मिळावा’, अशी त्यांची तळमळ असते. त्यांनी आमच्या गावातील त्यांच्या संपर्कातील साधकांना वेळ असेल, तेव्हा आमच्या घरी जाण्यास सांगितले होते.

३. ‘दादांनी आम्हाला आश्रमातील चैतन्य मिळावे’, यासाठी साधकाच्या समवेत आश्रमातील प्रसाद पाठवला.

२ आ. आसक्ती नसणे : दादांना कोणत्याच वस्तूची आसक्ती नाही. त्यांनी ‘स्वतःसाठी कधी काही खरेदी केले आहे’, असे मी पाहिले नाही. दादांना कुणी खाऊ पाठवला, तर ते स्वतः कधीच खात नाहीत. ते सहसाधकांना देतात.

२ इ. सेवेची तळमळ 

२ इ १. ‘श्री. शंकरदादांचे शिक्षण अल्प झाले असूनही केवळ सेवेच्या तळमळीमुळे ते अनेक सेवा कौशल्यपूर्ण आणि परिपूर्ण करतात.

२ इ २. सेवेला प्राधान्य देणे : शंकरदादा गुरूंच्या कार्याशी एकरूप होऊन सेवा करतात. वैयक्तिक काम किंवा सेवा यानिमित्त दादा बाहेरगावी गेले, तरी ‘तेथील प्रसाराच्या अंतर्गत काही सेवा आहे का ?’, याकडे त्यांचे लक्ष असते. ते स्वतःच्या वैयक्तिक कामांना किंवा घरी न्यूनतम वेळ देऊन सेवेला प्राधान्य देतात.

२ इ ३. सेवा समयमर्यादेत पूर्ण करणे : ‘दादा एखादी सेवा करण्यास विसरले आहेत किंवा त्यांची सेवा अपूर्ण राहिली आहे’, असे कधी होत नाही. दादांचे प्रत्येक सेवा वेळेत पूर्ण होण्याकडे लक्ष असते. त्यांना सतत सेवेचाच ध्यास असतो.

२ ई. शंकरदादांमुळे सद्गुरु स्वाती खाडये यांच्या सत्संगाचा लाभ होणे : आमच्या गावात महिलांसाठी सत्संग असतो. त्या सत्संगात एकदा सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन होते. शंकरदादांना याविषयी समजल्यावर त्यांनी सद्गुरु ताईंना ‘आम्ही घरी आहोत’, असे कळवले. तेव्हा सद्गुरु स्वातीताईंचा चरणस्पर्श आमच्या घराला झाला आणि त्यांच्या सत्संगाची संधी आम्हा कुटुंबियांना मिळाली.

‘प.पू. गुरुदेव, ‘तुमच्या कृपेने शंकरदादांमधील गुण लक्षात आले’, याबद्दल तुमच्या चरणी कृतज्ञता ! ‘शंकरदादांमधील गुण माझ्यात येण्यासाठी आपणच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २२.१२.२०२३)