राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीनंतर सरकारी शाळांतील पटसंख्या वाढण्याची शिक्षण खात्याला आशा
पणजी, १८ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील २१ टक्के सरकारी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या १० किंवा त्याहून अल्प आहे. राज्यात ६९० सरकारी प्राथमिक शाळा आहेत आणि यामधील १४१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या १० किंवा त्याहून अल्प आहे. ही माहिती सरकारी आकडेवारीतून मिळाली आहे.
विद्यार्थ्यांची पटसंख्या अल्प असलेली तालुकावार सूची पुढीलप्रमाणे आहे. पेडणे – १८, बार्देश – १०, डिचोली – ५, सत्तरी – १९, तिसवाडी – ३, फोंडा – १८, सांगे – १५, धारबांदोडा – १८, केपे – ११, काणकोण – १७, सासष्टी – ६ आणि मुरगाव – १. सरकारी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची
पटसंख्या वाढवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांविषयी शिक्षण खात्याच्या अधिकार्यांनी पुढील सूत्रे सांगितली.
१. राज्यात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०’ लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळेच सरकारी प्राथमिक शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे आणि यामुळेच पालक यापुढे पाल्यांना सरकारी प्राथमिक शाळेत पाठवण्यास सिद्ध होणार आहेत. सध्या पालक सरकार अनुदानित प्राथमिक शाळेत पाल्याला पाठवणे पसंत करत आहेत.
२. सरकारने सरकारी प्राथमिक शाळांमध्ये पात्रता असलेल्या शिक्षकांना नेमले आहे. या शिक्षकांना राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ अन् जिल्हा शिक्षण अन् प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने नियमितपणे प्रशिक्षण देत आहे. अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित इंग्रजी शिक्षक नेमण्यात आले आहेत.
३. सरकार सरकारी प्राथमिक शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे, तसेच सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य वह्या, पाठ्यपुस्तके, गणवेश आणि ‘रेनकोट’ वितरित केले जात आहेत.