परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील साधिका कु. स्मितल भुजले !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या कु. स्मितल भुजले यांच्या मनात काही दिवसांपासून स्वतःविषयी नकारात्मक विचार येत होते. त्यामुळे त्या सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आळवत होत्या. त्यांची तळमळ पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात त्यांना दर्शन देऊन मार्गदर्शन केले. त्याविषयी त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले आसंदीत बसलेले दिसताच त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मनात येणार्‍या नकारात्मक विचारांविषयी सांगणे आणि त्यांचे बोलणे ऐकून भावजागृती होणे

कु. स्मितल भुजले

‘काही दिवसांपासून माझ्या मनात स्वतःविषयी पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. ४.२.२०२४ या दिवशी इतर साधकांमधील गुण बघून माझ्या मनात ‘माझ्यामध्ये असे गुण नाहीत’, असा नकारात्मक विचार येऊन मला वाईट वाटत होते. ५.२.२०२४ या दिवशी पहाटे ५ वाजता मला स्वप्न पडले. स्वप्नात मला परम पूज्य माझ्या घरी आसंदीत बसलेले दिसले. परम पूज्यांना पाहून मी त्यांच्या जवळ गेले आणि मी त्यांना माझ्या मनात येणारे सर्व नकारात्मक विचार सांगितले. मी त्यांना सांगू लागले, ‘माझ्यात तुम्हाला अपेक्षित असा व्यष्टी किंवा समष्टी एकही गुण नाही. मला काहीच येत नाही, तर मी आश्रमात कशी सेवा करू ? मी काय करू ?’ तेव्हा माझ्याकडे पाहून ते मला म्हणाले, ‘तू एवढे विष पचवले आहेस. अजून काय हवे ?’ त्यांचे ते वाक्य ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. थोड्या वेळाने मला रडत रडतच जाग आली.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या सेवेत असणार्‍या साधकाशी कु. स्मितल भुजले यांची विचारपूस करणे

५.२.२०२४ या दिवशी मी दुपारी रामनाथी आश्रमात महाप्रसाद ग्रहण करत असतांना परम पूज्यांच्या सेवेत असणारे साधक माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला सांगितले, ‘‘४.२.२०२४ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेले तुझे छायाचित्र पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तुझी विचारपूस केली.’’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापर्यंत हाक पोचल्यामुळे आनंद होणे

साधकाचे बोलणे ऐकून काही क्षण माझा विश्वासच बसेना. गेल्या काही दिवसांपासून मी मनातून परम पूज्यांना सारखी हाक मारत होते; पण याविषयी मी कुणालाच काही सांगितले नव्हते. माझी हाक परम पूज्यांपर्यंत पोचल्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. ‘देवालाच आपली हाक ऐकू येऊ शकते’, असे माझ्या लक्षात आले. ‘परम पूज्य आपल्या अंतःकरणात वास करत असल्यामुळे त्यांना सर्वकाही कळते’, याची मला जाणीव झाली.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला ‘तेच स्वतः महादेव आहेत’, याची पुन्हा एकदा अनुभूती देणे

‘आम्ही आमच्या घरात शिवाचे मोठे चित्र लावले आहे. स्वप्नात मला परम पूज्य त्या शिवाच्या चित्राखाली बसलेले दिसले. त्या चित्राखाली बसून ते माझ्याशी बोलत होते. गेली कित्येक वर्षे मला आणि आईला पुष्कळ कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. ‘आम्हाला त्याचा परिणाम अजूनही थोड्या फार प्रमाणात भोगावा लागत आहे’, हे परम पूज्यांना ठाऊक आहे. त्यासाठी त्यांनी ‘तू विष पचवले’, असे मला म्हटले असावे’, असे मला वाटले. ‘विष’ हे शिवाशी संबंधित आहे आणि पहाटे ते माझ्या स्वप्नात आले, तो दिवस सोमवार होता. स्वप्नात ज्या ठिकाणी परम पूज्य बसले होते, त्या ठिकाणी शिवाचे मोठे चित्र आम्ही लावले आहे. या स्वप्नाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा ‘तेच महादेव आहेत’, याची मला अनुभूती दिली.

‘परम पूज्यांना प्रत्येक हाक आणि प्रत्येक प्रार्थना ऐकू येते आणि ते प्रत्येक क्षणी आपल्या समवेत असतात’, हे मला अनुभवायला मिळाले.

‘परम पूज्य, तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. स्मितल भुजले, फोंडा, गोवा. (७.२.२०२४)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक