१. पू. सौरभ जोशी यांना (आध्यात्मिक भावाला) संत, साधिका आणि नातेवाईक यांनी राखी पाठवणे
पूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला असलेले पू. सौरभ जोशी (सनातनचे विकलांग संत) सध्या पिंगुळी, कुडाळ येथे वास्तव्याला आहेत. या वर्षी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून कु. रुचिका जाधव, कु. पूनम मुळे (आताच्या सौ. पूनम ढगे), श्रीमती आदिती देवल (आताच्या कै. (श्रीमती) आदिती देवल आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६६ वर्षे) आणि पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाईआजी यांनी पू. सौरभदादांना राख्या पाठवल्या होत्या. पू. सौरभदादा यांची आत्या सौ. कृपा कृष्णकांत राईलकर यांनी ‘प.पू. सौरभदादा’ असे लिहून राखी पाठवली होती.
२. रक्षाबंधनाच्या दिवशी पू. सौरभ जोशी भ्रमणभाषवरून पू. (सौ.) मालिनी देसाईआजी आणि कु. सायली देशपांडे यांच्याशी बोलणे अन् त्यांनी सायलीला ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे गाणे म्हणायला सांगणे
रक्षाबंधनाच्या दिवशी पू. दादांना औक्षण करून राख्या बांधल्या. या वेळी पू. दादा भ्रमणभाषवरून पू. (सौ.) देसाईआजी आणि त्यांच्या सेवेत असणारी कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १४ वर्षे) यांच्याशी बोलले. पू. दादांनी सायलीला ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे त्यांचे आवडते गाणे म्हणायला सांगितले.
३. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आम्हाला प्रतिवर्षीप्रमाणे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातच रक्षाबंधन होत असल्याचे अनुभवता आले.
४. पू. सौरभदादांच्या चरणी बेळगाव, कर्नाटक येथील सौ. वेदश्री गोरल यांनी काव्यरूपी कृतज्ञतापुष्प अर्पण करणे
बेळगाव येथील साधिका सौ. वेदश्री गोरल पूर्वी रामनाथी आश्रमात सेवेला होत्या. त्या वेळी सौ. वेदश्री यांना पू. दादांच्या संदर्भात आलेल्या अनुभूतींबद्दल त्यांनी काव्यस्वरूपात कृतज्ञता व्यक्त केली आणि ते काव्य भ्रमणभाषवरून पू. सौरभदादांना पाठवले.
४ अ. तुमच्या सत्संगातील भावक्षण अजूनही मी जपते !
या जन्माचे सार्थक झाले ।
संतांच्या रूपात भाऊ मिळाले ।। १ ।।
अंतरातून नाते हे जुळले ।
अन् गुरुदेवांच्या साक्षीने नाते हे फुलले ।। २ ।।
जाणूनी या अज्ञानी बहिणीच्या मनातील भाव ।
पू. सौरभदादा साधनेच्या दृष्टीने व्यक्त करती हावभाव ।। ३ ।।
तुमच्या सत्संगातील ते भावक्षण अजूनही मी जपते ।
‘तुमची कृपा माझ्यावर असावी’, अशी प्रार्थना
‘श्रीं’च्या (टीप) चरणी करते ।। ४ ।।
(टीप : पू. सौरभदादा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘श्री’ असे संबोधतात.)
५. पू. सौरभदादांची कृपा अनुभवत असल्याबद्दल पुणे येथील सौ. श्रेया साने यांनी भ्रमणभाष करून कृतज्ञता व्यक्त करणे
पुणे येथील साधिका सौ. श्रेया साने यांनी रक्षाबंधनानिमित्त पू. सौरभदादांना भ्रमणभाषवरून संपर्क करून नमस्कार केला आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांनी पू. सौरभदादा यांच्या माध्यमातून माझ्यावर पुष्कळ कृपा केली. कोरोनाच्या काळात उद्भवलेल्या कठीण प्रसंगात मी पू. दादांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी मला पुष्कळ आधार दिला. त्यांना स्पष्ट बोलता येत नसले, तरीही माझ्या मनातील विचारांनुसार ते ‘हो, नाही, नको’, असे म्हणून प्रतिसाद द्यायचे, तर कधी खदखदून हसायचे. त्यांनी मला कठीण परिस्थितीतून वेळोवेळी बाहेर काढले. आताही मी पू. दादांना प्रार्थना करत असते आणि मला कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. केवढी ही भगवंताची कृपा !
‘पू. सौरभदादांसारखे सूक्ष्मातील अफाट सामर्थ्य आणि प्रीतीचे प्रतीक असलेले भाऊ गुरुदेवांनी मला दिले’, याबद्दल मी गुरुदेव आणि पू. सौरभदादा यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’’
– श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग. (१.९.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |