क्रोध हाच जिंकण्यास कठीण शत्रू !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्न : कः शत्रुर्दुर्जयः पुंसाम् ?

अर्थ : माणसाचा जिंकावयास कठीण असा शत्रू कोण ?

उत्तर : क्रोधः दुर्जयः शत्रुः ।

अर्थ : क्रोध हा जिंकण्यास कठीण शत्रू आहे.

गीतेने माणसाचे शत्रू म्हणून काम आणि क्रोध या दोन्ही विकारांचा उल्लेख केला आहे. कामाची तृप्ती होत नसल्यामुळे त्यातून क्रोध उत्पन्न होतो; म्हणून आधी काम आणि मागून क्रोध असा अनुक्रम आहे. संतांनी पुष्कळदा कामाच्या आधी क्रोधाचा उल्लेख केला आहे.

‘नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ।।’, असे समर्थांनी क्रोधाला प्राधान्य देऊन सांगितले आहे. वयोमानाने शरीर दुर्बल होत जाईल, त्या प्रमाणात उपभोग सामर्थ्य उणावते; म्हणून कामाला मर्यादा पडते. त्यामुळे कदाचित् क्रोध वाढतो आणि माणसाचा स्वभाव रागीट, संतापी अन् चिडचिडा असा होतो. त्यायोगाने भोवतालची परिस्थितीही स्वतःला आणि दुसर्‍याला दुःखदायक होते. म्हातारी माणसे ‘अधिक तामसी, तापट आणि हेकट होतात’, असे आढळते. हे सर्व उण्या-अधिक प्रमाणात क्रोधाचेच प्रगटीकरण असते. वयोमानाने मनुष्य अधिक शांत, सात्त्विक व्हायला हवा; पण आढळते ते उलटेच !

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)