बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या माध्यमातून असे रचले गेले ‘वन्दे मातरम् ।’

बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘आनंदमठ’ कादंबरीचा बीजमंत्र होता, ‘वन्दे मातरम् ।’ बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वन्दे मातरम्’चा उपयोग युद्धगर्जनेच्या स्वरूपात केला आणि आपल्या काव्यास रणगर्जनेचे रूप दिले. वर्ष १९३१ चे काँग्रेसचे अधिवेशन कराचीत झाले. त्यात केलेल्या उपसमितीत हिंदु-मुसलमान सदस्य होते. चर्चेअंती समितीने ‘वन्दे मातरम्’चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला. ‘वन्दे मातरम्’ रचण्यामागील इतिहास कसा होता ? ते येथे देत आहोत.


‘वन्दे मातरम् ।’

बंकीमचंद्र चट्टोपाध्याय (२७ जून १८३८ ते ८ एप्रिल १८९४)

सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्

शस्यश्यामलाम् मातरम् ।

वन्दे मातरम् ।

शुभ्रज्योत्स्नाम् पुलकितयामिनीम्

फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीम्

सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्

सुखदाम् वरदाम् मातरम् ।।

वन्दे मातरम् ।

१. ‘बंगदर्शन’ नियतकालिकास प्रारंभ !

वर्ष १८७२ मध्ये बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘बंगदर्शन’ नामक नियतकालिकाचे संपादन चालू केले. ते सरकारी नोकरीत असल्याने त्यांचे सतत स्थानांतर होत असे. त्यांचे एका ठिकाणी डेप्युटी मॅजिस्ट्रेट पदावर स्थानांतर झाले.

२. बंगदर्शनच्या एका अंकात रिकाम्या जागेत बंकीमचंद्रांनी ‘वन्दे मातरम् ।’ लिहिणे

एकदा ‘बंकीमबाबू’ अशी हाक ऐकू आल्यावर त्यांनी पाहिले, तर श्रीरामचंद्र बंदोपाध्याय समोर उभे होते. ते विद्वान होते आणि बंगदर्शनचे लिखाण वाचत होते. त्यांनी सांगितले की, बंगदर्शनाचा पुढचा अंक २-४ दिवसांत निघणार आहे. शेवटच्या पानावर सुमारे अर्धे पान अथवा १० ते १५ ओळींची जागा शिल्लक आहे. त्याचे काय करावे ? बंकीमचंद्रांनी रिकाम्या जागेत लिहिले, ‘वन्दे मातरम् ।’

३. ‘वन्दे मातरम् ।’ लिहिण्यापूर्वी सस्यश्यामल भूमी, दशभुजादेवी, फुलांची बाग असे दृश्य दिसणे

बंकीम जेव्हा काही लिहित, तेव्हा ते मध्ये मध्ये न थांबता एकटाकी सगळा लेख पूर्ण करत; पण तत्पूर्वी काही दिवस त्या विषयावर त्यांचे चिंतन-मनन झालेले असायचे. या वेळी त्यांना सस्यश्यामल भूमी, दशभुजादेवी, फुलांची बाग या आशयाचे दृश्य दिसत होते. त्यांनी लिहायला प्रारंभ केला-

सुजलां सुफलां मलयजशीतलाम् शस्यशामलां मातरम् ।

शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुखदां वरदां मातरम् ।। १ ।।

कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले, अबला केन मा एत बले ।

बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरम् ।। २ ।।

त्यांनी पंडितजींना बोलावून कविता दिली. पंडितजी म्हणाले, ‘‘ठीक आहे; पण भाषा अशुद्ध आहे. बंगाली आणि संस्कृत दोन्हींचे मिश्रण आहे.’’ बंकीमजी म्हणाले, ‘‘चांगले आहे कि वाईट हे ठाऊक नाही; आहे असेच छापा. मला विश्वास वाटतो, लोकांना आवडेल.’’

४. लोक आणि देश यांच्या विचारांतून निर्मिली ‘आनंदमठ’ कादंबरी अन् तिचा बीजमंत्र ‘वन्दे मातरम्’ असणे

वर्ष १८७६ पर्यंत बंगदर्शन ४ वर्षांत पुष्कळ लोकप्रिय झाले होते; पण सरकारी नोकरीमुळे सर्व प्रकाराचे लिखाण करण्यात अडचण यायची. शेवटी त्यांनी ‘बंगदर्शन’ बंद करण्याचा विचार केला. त्यांनी महाभारताचा अभ्यास केला. त्यांना वाटायचे, ‘लोक, देश यांना एका सूत्रात बांधले पाहिजे. परस्परांपासून तुटलेल्या, एकसूत्र नसलेल्या लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. आपल्या लेखणीस नवी दिशा द्यायला हवी.’ याचे पर्यवसान ‘आनंदमठ’ कादंबरीच्या रूपाने पहायला मिळाले. तिचा बीजमंत्रच होता ‘वन्दे मातरम्’ ।

५. ‘वन्दे मातरम् ।’ आणि बंकीमचंद्र !

५ अ. ‘वन्दे मातरम् ।’ म्हणतांना भान विसरून गाणारे बंकीमचंद्र ! : त्यांनी ‘वन्दे मातरम् ।’चा उपयोग युद्धगर्जनेच्या स्वरूपात केला आणि आपल्या कवितेस रणगर्जनेचे रूप दिले. या प्रक्रियेस ८ वर्षे लागली. वर्ष १८८२ मध्ये ‘आनंदमठ’ कादंबरी छापली गेली आणि ती बंकीमचंद्रांची सर्वाधिक चर्चिली गेलेली कादंबरी ठरली ! जेव्हा जेव्हा बंकीम ‘वन्दे मातरम् ।’ म्हणत, तेव्हा तेव्हा ते भान विसरून गात. एकदा त्यांनी आपल्या ज्येष्ठ कन्येला ‘वन्दे मातरम् ।’ ऐकवले. ते त्यात इतके तल्लीन झाले की, मुलीने कित्येकदा बोलावूनही ते भानावर आले नाहीत. ते भानावर आले, तेव्हा मुलगी म्हणाली, ‘‘बाबा, तुम्ही रडत होतात.’’

५ आ. ‘आनंदमठ’च्या माध्यमातून लोकांना नवाबांविरुद्ध जातीभेद विसरून संघटित होण्यास सांगणारे बंकीमचंद्र ! : ब्रिटिशांच्या काळात भारतावर अन्याय होत असल्याचे त्यांना वाटायचे. निवळ शोषण केले जात असल्याचेही त्यांच्या लक्षात यायचे. ‘इंग्रजांच्या अत्याचारातून देश मुक्त व्हायला हवा’, असे वाटायचे; पण सरकारी नोकरीमुळे ते थेट इंग्रजांविरोधात बोलू शकत नव्हते. यासाठी त्यांनी ‘आनंदमठ’चे साहाय्य घेतले. नवाबांविरुद्ध लोकांना जातीभेद विसरून संघटित होण्यास सांगितले.

६. जवाहरलाल नेहरूंच्या सूचनेनुसार ‘वन्दे मातरम् ।’ला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता मिळणे

२८ ते ३१ डिसेंबर १८८५ या कालावधीत काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत झाले. वर्ष १८९६ मध्ये कोलकाता येथे अधिवेशन झाले होते. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यात ‘वन्दे मातरम् ।’ची पहिली दोन कडवी गायली; पण ८ जून १८९४ या दिवशी बंकीमचंद्रांचे निधन झाले होते. वर्ष १९३७ च्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या सहसमितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू ! त्यांच्या सूचनेनुसार ‘वन्दे मातरम् ।’ला राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारण्यात आले.

 ७. इंग्रजांच्या विरोधातील आंदोलनात रवींद्रनाथांनी ‘वन्दे मातरम् ।’ गाणे

वर्ष १९०५ मध्ये बंगालचे पश्चिम आणि पूर्व बंगाल असे तुकडे करण्याची इच्छा इंग्रजांनी दाखवली, तेव्हा अनेक लोक याविरोधात आंदोलनार्थ रस्त्यावर उतरले. या आंदोलनात रवींद्रनाथांनी ‘वन्दे मातरम् ।’ गायले. विद्यार्थ्यांनीही ‘वन्दे मातरम् ।’ म्हणून घोषणा दिल्या. इतके सारे असले, तरी ‘आनंदमठ’वर कधी बंदी आली नाही; मात्र ‘वन्दे मातरम् ।’ म्हणणार्‍यांना कारावासात जावे लागे. बहुदा इंग्रजांना वाटत असावे की, ‘आनंदमठ’मुळे हिंदु-मुसलमानांत शत्रुत्व वाढेल आणि त्याचा त्यांना लाभ मिळेल.

८. ‘वन्दे मातरम् ।’च्या तिसर्‍या कडव्यापासून भारतमाता आणि दुर्गादेवी एकरूप होत असणे

‘वन्दे मातरम् ।’च्या तिसर्‍या कडव्यापासून पुढे भारतमाता आणि दुर्गादेवी एकरूप होऊन जातात. त्यात म्हटले आहे, ‘त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम् ।’ या सर्वांमुळे भिन्न धर्मियांची हरकत येऊ शकते; पण ‘वन्दे मातरम् ।’ म्हणत म्हणून जे लोक फासावर गेले अथवा काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यास गेले, ते सारेच वीर भारतमातेच्या स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवून होते.

९. गांधींनी त्यांच्या पत्रांचा समारोप ‘वन्दे मातरम् ।’ मोहनदास’ असा करणे

वर्ष १९२० पर्यंत गांधी त्यांच्या पत्रांचा समारोप ‘वन्दे मातरम् ।’ मोहनदास’ असा लिहून करत. त्यांनी त्यांच्या प्रार्थनासभांमध्ये हिंदीतून बोलण्यास प्रारंभ केला. ‘रामधून’च्या बरोबरीने त्यांनी ‘वन्दे मातरम् ।’लाही आपलेसे केले.

१०. बंकीमचंद्रांनी दिलेला मंत्र : ‘वन्दे मातरम् ।’!

वर्ष १९०६ मध्ये अरविंद घोष यांनी ‘वन्दे मातरम् ।’ नावाचे नियतकालिक संपादन करण्यास प्रारंभ केला. याच ‘वन्दे मातरम् ।’मध्ये त्यांनी १९०७ मध्ये लिहिले, ‘‘याआधी ३२ वर्षांपूर्वी बंकीमजींनी या महागीताची रचना केली होती. त्या काळी थोडेच लोक ‘वन्दे मातरम् ।’ जाणत होते; पण त्यानंतर एका मंगल मुहूर्तावर बंगाली जनता प्रदीर्घ अशा घोर निद्रेतून जागी झाली. तिने सत्याच्या शोधार्थ चोहीकडे दृष्टी टाकली अन् ईश्वरी संकेताने निर्धारित सुमुहूर्तावर कुणी गाऊ लागले. सर्वांनाच ‘वन्दे मातरम् ।’ मंत्र प्राप्त झाला !’’

११. वर्ष १९३१ मध्ये ‘वन्दे मातरम् ।’चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार !

वर्ष १९३१चे काँग्रेसचे अधिवेशन कराचीत झाले. या अधिवेशनात जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती सिद्ध केली गेली. तिच्यात हिंदु-मुसलमान असे सदस्य होते. भरपूर चर्चेच्या अंती समितीने ‘वन्दे मातरम् ।’चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.

१२. भारताचे राष्ट्रगान झाले ‘वन्दे मातरम् ।’

सुभाषचंद्र बोस यांचे म्हणणे होते की, ‘वन्दे मातरम् ।’च्या केवळ पहिल्या दोन कडव्यांचाच स्वीकार करावा. यासाठी त्यांनी संबंधितांशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी सकारण संमतीपत्र लिहून धाडले. अशा प्रकारे ‘वन्दे मातरम् ।’ भारताचे राष्ट्रगान होऊन गेले. वर्ष १९०६ मधील काँग्रेसच्या अधिवेशनात सरला घोषालने एक उद्बोधन गीत म्हणून हे गीत गायले होते.

१३. ‘वन्दे मातरम् ।’ला राष्ट्रीय गीत म्हणून प्रतिष्ठा, तर ‘जन-गण-मन’ला राष्ट्रगीत गौरव प्राप्त !

स्वतंत्र भारतात २५ ऑगस्ट १९४८ च्या घटना समितीच्या सभेत रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘जन-गण-मन’ची पहिली दोन कडवी राष्ट्रगीताच्या दर्जास पोचली. त्या काळी भारतातील भिन्नभिन्न भाषांमध्ये पुष्कळ राष्ट्रीय गीते लिहिली गेली. २४ जानेवारी १९५० या दिवशी ‘वन्दे मातरम् ।’ला राष्ट्रीय गीत म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यात आली आणि ‘जन-गण-मन’ला राष्ट्रगीत गौरव देण्यात आला.

(भवन्स नवनीत : ऑगस्ट २०२१ मधून भाषांतरीत लिखाण)