CM Yogi On Bangladeshi Hindu : बांगलादेशातील हिंदूंसाठी कुणीच काही बोलत नाहीत !

  • उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रहार !

  • बांगलादेशातील आताच्या स्थितीची फाळणीच्या वेळेशी केली तुलना !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – वर्ष १९४७ मध्ये घडलेली गोष्ट आज बांगलादेशात पुन्हा घडत आहे. बांगलादेशातील हिंदु स्वतःच्या जिवाची याचना करत आहेत. बांगलादेशातील हिंदूंसाठी कुणीच काही बोलत नाही. भारतात सर्व लोकांची तोंडे शिवली गेली आहेत, अशी टीका उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केली.

ते हजरतगंजमध्ये फाळणीच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित सभेत बोलत होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की,

भारताच्या फाळणीला काँग्रेसच उत्तरदायी !

भारताच्या फाळणीला काँग्रेसच उत्तरदायी आहे. फाळणीची शोकांतिका पुन्हा घडू देणार नाही. काँग्रेसला केवळ मतपेढीची चिंता आहे. जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पाकचे भारतात विलिनीकरण होईल अथवा तो नष्ट होईल !

पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की, त्याचे एकतर भारतात विलीनीकरण होईल किंवा इतिहासातून तो कायमचा पुसला जाईल. महर्षी अरविंद यांनी वर्ष १९४७ मध्येच घोषित केले होते की, आध्यात्मिक जगात पाकिस्तानचे वास्तव नाही. जेव्हा आध्यात्मिक जगात एखाद्याचे खरे रूप नसते, तेव्हा त्याला नष्ट करावे लागते. त्याच्या मृत्यूकडे आपण संशयाने पाहू नये. हे घडेल यावर आपण विश्‍वास ठेवला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करू.

उद्ध्वस्त तीर्थक्षेत्रे सुधारावी लागतील !

परकीय आक्रमकांना भारतात प्रवेश करून भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त केलेल्या चुकाही दुरुस्त कराव्या लागतील आणि अशा सर्व चुका अन् फाळणीच्या शोकांतिकेवर मात करावी लागेल; कारण ती धार्मिक, प्रादेशिक आणि भाषिक होती. या गोष्टी दूर करून ‘राष्ट्र प्रथम’ या दृष्टीने काम करावे लागेल.

राजकीय स्वार्थासाठी भारताला फाळणीच्या शोकांतिकेकडे ढकलले गेले !

या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले होते की, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भावपूर्ण भावनेची जगाला ओळख करून देणार्‍या आपल्या भारतमातेला वर्ष १९४७ च्या या दिवशी (१४ ऑगस्टला) राजकीय स्वार्थासाठी फाळणीच्या शोकांतिकेकडे ढकलले गेले. या अमानुष निर्णयामुळे केवळ देशाची फाळणी झाली नाही, तर असंख्य निष्पाप नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला. विस्थापनाचा फटका सहन करावा लागला, यातना सहन कराव्या लागल्या. या अमानुष दुर्घटनेत बळी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना आज (१४ ऑगस्टला) ‘फाळणीच्या स्मृतीदिनी’ विनम्र आदरांजली !