श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍यातील छताच्या शिळांना तडे !

श्री तुळजाभवानी

तुळजापूर (जिल्हा सोलापूर) – साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्राची कुलदेवी असणार्‍या श्री तुळजाभवानी मंदिरातील गाभार्‍याच्या छताला आणि शिखराच्या खालील भागाला तडे गेले आहेत. गाभार्‍यातील ग्रॅनाईट काढल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सचिन आेंबासे यांनी पहाणी केल्यावर गाभार्‍यातील दगड, शिळांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (इमारतीच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी, तसेच संभाव्य समस्या ओळखण्यासाठी केलेली सखोल तपासणी) करण्याची सूचना त्यांनी दिली. या वेळी पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालिका जया वहाणे, वास्तूविशारद तेजस्विनी आफळे या उपस्थित होत्या.

शिळांना पडलेल्या या भेगा कुठेपर्यंत आहेत ? आणखी किती शिळांना भेगा आहेत ? याची पहाणी करण्यासाठी पुरातत्व विभागातील तज्ञांना बोलावण्यात येणार आहे. मंदिरात सध्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे चालू आहेत. ज्या ठिकाणी दगडी बांधकाम आहे, ते त्याचप्रकारे रहावे, यासाठी पुरातत्व विभागाचे प्रयत्न आहेत.

संपादकीय भूमिका

भाविकांची मंदिर समिती असती, तर समस्या उद्भवण्याआधी त्यावर उपाय निघाला असता. असे प्रकार मंदिरात घडतात, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम होय !