भगवान परशुराम यांच्याविषयी दिशाभूल करणे आणि ब्राह्मणांच्या विरोधात प्रक्षोभक लिखाण करणे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी
फोंडा – मठ आणि मंदिरे यांना ‘लुटारू’ संबोधून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी मडगाव, गोवा येथील लेखक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात फोंडा पोलीस ठाण्यात आणखी एक तक्रार नोंद झालेली आहे. ‘पुरोहित ब्राह्मण संघा’च्या गोवा प्रदेशाचे कार्यवाह श्री. समीर किंजवडेकर यांनी भगवान परशुराम यांच्याविषयी दिशाभूल करणे आणि ब्राह्मणांच्या विरोधात प्रक्षोभक लिखाण करणे, यांप्रकरणी लेखक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्याकडे तक्रार केली आहे. तक्रारीमध्ये दत्ता नायक यांच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रार नोंदवतांना ‘पुरोहित ब्राह्मण संघा’चे सर्वश्री विश्वनाथ जोशी, संतोष टेंग्से, श्रेयस पिसोळकर, मयूर फडके, रूपेश बांदेकर आणि उद्योजक विठ्ठल मिरिंगकर यांची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे आश्वासन ‘पुरोहित ब्राह्मण संघा’ला दिले आहे.
‘पुरोहित ब्राह्मण संघा’ने तक्रारीत नमूद केलेली सूत्रे
१. लेखक दत्ता नायक यांनी २४ डिसेंबर या दिवशीच्या दैनिक ‘गोमंतक’मध्ये भगवान श्री परशुरामाविषयी समाजाची दिशाभूल करणारे आणि ब्राह्मणांच्या विरोधात चिथावणी देणारे पुढील प्रक्षोभक लिखाण केले आहे. ‘ब्राह्मणकुलीन परशुरामाने क्षत्रियांचे २१ वेळा निर्दालन केले, ही गोष्ट
फातर्पेचे मराठाकुलीन देसाई विसरले का ? मग ब्राह्मणांचा सूड त्यांनी नको का उगवायला ? ब्राह्मणांवर बहिष्कार नको का घालायला ?’’
२. लेखक दत्ता नायक यांनी अन्य एका मुलाखतीत ‘पर्तगाळ मठ, मंदिरे, भट’ हे सर्व जण लुटतात’, असे विधान एका मुलाखतीत केले आहे.
दत्ता नायक यांनी केलेल्या लिखाणामुळे समाजात अशांती आणि असंतोष पसरला आहे.