रत्नागिरी येथे गस्ती नौकेवरील कर्मचार्‍यांवर आक्रमण करणार्‍या मासेमारांना नौकेसह घेतले कह्यात

सागरी सुरक्षेसाठी ड्रोन प्रणालीचे उद्घाटन होण्याच्या पूर्वसंध्येला परप्रांतीय मासेमारांनी दिलेल्या आव्हानाला मस्यविभागाचे प्रत्युत्तर

रत्नागिरी – मलपी, कर्नाटक येथील अनुमाने २५ ते ३० अतीवेगवान मासेमारी नौकांनी येथील समुद्रात अतिक्रमण केले आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने या नौकांचा पाठलाग केला. या वेळी ‘अधिरा’ (IND-KL-02-MM5724) या नौकेला कह्यात घेण्याचा प्रयत्न केला जात असतांना मलपी येथील अन्य नौकांनी ‘गस्ती’ नौकेला घेरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी या नौकेवरील खलाशांनी ‘गस्ती’ नौकेवरील कर्मचार्‍यांवर चाकूने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. असे असतांनाही मत्स्यव्यवसाय विभागाच्या कर्मचार्‍यांनी धाडस दाखवून त्या नौकेला कह्यात घेतले.

८ जानेवारीच्या रात्री मलपी, कर्नाटक येथील मासेमारी नौकांचे अतिक्रमण होत असल्याची माहिती स्थानिक मासेमारांकडून मिळाल्यानंतर येथील मत्स्यविभागाची गस्ती नौका गोळप-पावसच्या दिशेने पाठवण्यात आली. या घटनेत अन्य नौकांनी गस्ती नौकेला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच नौकेवरील कर्मचार्‍यांनी ही माहिती साहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांना कळवली. त्यांनी आजूबाजूच्या मासेमारी करणार्‍या स्थानिक लोकांना संदेश देऊन गस्ती नौकेला साहाय्य करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर स्थानिक ८ ते १० मासेमारी नौका घटनास्थळी दाखल झाल्या. या वेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क करून अतिरिक्त पोलीस बळही गस्ती नौकेच्या साहाय्यासाठी पाठवण्यात आले. गस्ती नौका पाठलाग करत असल्याचे पहाताच मलपी नौकेवरील खलाशांनी नौकेवरील दोर्‍या समुद्रात सोडल्या. त्यातील दोर्‍या गस्ती नौकेच्या पंख्यामध्ये अडकल्याने गस्ती नौका जागेवरच बंद पडली, तसेच ‘अधिरा’ ही नौकाही रोखली गेली होती. गस्ती नौका बंद पडल्यामुळे इतर नौकांनी आक्रमण करण्याचा प्रसंग जिवावर बेतणारा होता; मात्र स्थानिक नौकांचे साहाय्य, अतिरिक्त पोलिसांची कुमक या गोष्टींमुळे पकडलेली नौका, तसेच गस्ती नौका ‘टोईंग’ करून (दोन नौकांना एकत्र बांधून) मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या. या नौकेवर ‘म.सा.मा.नि.अ. १९८१’ या कायद्याच्या अंतर्गत दावा प्रविष्ट करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

संबंधितांवर कडक कारवाई करा ! – मंत्री नितेश राणे यांचे अधिकार्‍यांना आदेश

केवळ मासेमारी हा विषय नाही; पण या प्रकरणात चाकूने आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याने तो वेगळा गुन्हाही आहे, हे लक्षात घेऊन पकडलेल्या नौकेवर अतिशय कडक कारवाई करा. त्यांना अधिकाधिक दंड करून पोलिसांना सांगून कडक गुन्हे नोंदवायला सांगा; कारण हे आक्रमण आहे. या घटनेच्या निमित्ताने थोडा तरी वचक बसवा, जेणेकरून पुढच्या वेळी दुसरा कुणी असा गुन्हा करतांना विचार करील, असे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी या घटनेच्या अनुषंगाने अधिकार्‍यांशी बोलतांना दिले.