वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या सेवा प्रस्तावाला मान्यता
पंढरपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकारानने पंढरपूरसाठी १ सहस्र खाटांचे रुग्णालय संमत करण्यात आले आहे. या संदर्भातील अध्यादेश नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती ‘वारकरी संप्रदाय पाईक संघा’चे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, ह.भ.प.विठ्ठल महाराज चवरे, ह.भ.प. नागेश महाराज बागडे, ह.भ.प. रघुनाथ महाराज कबीर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. राज्यशासनास पंढरपूर नागरिक आणि वारकरी संप्रदाय यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी ‘भुवैकुंठ पंढरी विकास आराखडा’ सादर करण्यात आला होता. यात पंढरपूरसाठी ‘श्री विठ्ठल रुक्मिणी वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालया’चा प्रस्ताव मांडण्यात आला होता. आषाढी यात्रेच्या अगोदर आळंदी येथे प्रस्थानाच्या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर आणि ह.भ.प. विठ्ठल महाराज चवरे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या शिष्टमंडळाने चर्चा केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री महोदयांनी याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांना दिला होता.
२. त्यानंतर लिखित स्वरूपात ‘वारकरी संप्रदाय सेवा प्रस्ताव’ विभागीय आयुक्तांकडे सुपुर्द करण्यात आला. याला तात्काळ मान्यता देत मुख्यमंत्र्यांनी एकादशीच्या दिवशी ‘१ सहस्र खाटांचे रुग्णालय संमत करत आहे’, अशी घोषणा केली.
३. या संदर्भात अधिकृत परिपत्रक शासनाने प्रसिद्ध केले असून लवकरच यासाठी जागा निर्धारित करून हे काम चालू केले जाणार आहे. या कामी पाठपुरावा करतांना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांसह अन्यांनी विशेष प्रयत्न केले.