साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
सध्या समाजात बर्याच जणांना भ्रमणभाषवर गुन्हेगारांकडून ‘सीमा शुल्क (कस्टम) अधिकारी बोलत आहे’, असे सांगून भ्रमणभाष करतात आणि चौकशीच्या नावाखाली धमकावून मानसिक खच्चीकरण करून लाखो रुपयांना लुटतात, असे समोर आले आहे. स्वतःची फसवणूक होऊ नये आणि याविषयी कोणती काळजी घ्यावी, हे येथे सांगत आहोत.
१. फसवणूक करण्यासाठी वापरलेली पद्धत
१ अ. प्रथम संपर्क करणे
एक रेकॉर्ड केलेला संदेश आपल्याला भ्रमणभाषवर येतो. यावरून आपल्याला अधिक माहितीसाठी भ्रमणभाषचा एखादा आकडा (बटन) दाबण्यासाठी सांगितले जाते.
१ आ. वैयक्तिक संपर्क
‘मी सीमा शुल्क अधिकारी आहे’, असे सांगणारी व्यक्ती आपल्याला भ्रमणभाष करते. ‘तुमच्या नावाने संशयित पार्सल आले आहे आणि त्यात बेकायदेशीर साहित्य असल्यामुळे ते कह्यात घेतले आहे’, असे तो आपल्याला सांगतो. याचप्रमाणे अन्य शासकीय विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून ‘आपल्या नावे अनेक बनावट (खोटे) पारपत्र (पासपोर्ट) बनवलेले आहेत किंवा तुमच्या या संपर्क क्रमांकावर गुन्हे नोंदवलेले आहेत’, आदी प्रकारची माहिती ती व्यक्ती सांगते.
१ इ. माहिती गोळा करणे
‘अधिकारी’ म्हणून बनाव केलेली व्यक्ती आवश्यकतेनुसार गोड बोलून किंवा धाकदपटशा करून आपल्याकडे बँक व्यवहाराविषयी विचारते, तसेच आपल्याकडे पासवर्डही (संकेतांक) मागते.
१ ई. धमकावणे
ते आपल्याला वैयक्तिक माहिती देण्याविषयी, तसेच ‘तुमची चौकशी करण्यासाठी तुम्हाला अन्य राज्यात यावे लागेल’, असे सांगून आपल्याला धमकावतात.
२. यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा ?
२ अ. शांत रहा
अशी माहिती कुणी विचारत असल्यास शांत रहा आणि स्वतःची कोणतीही माहिती त्यांना देऊ नका.
२ आ. पुरावा देण्याची विनंती करा
आपल्या नावे ज्या संशयित पार्सलचा उल्लेख संभाषणाच्या वेळी करण्यात येतो, त्याचे छायाचित्र देण्याची मागणी करा.
२ इ. असा फसवणुकीचा भ्रमणभाष आल्यावर तो तात्काळ डिसकनेक्ट (बंद) करा !
२ ई. तक्रार करा
याविषयी स्वतःच्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करा.
३. महत्त्वाची सूत्रे
३ अ. कुणाचीही वैयक्तिक माहिती दूरभाष किंवा भ्रमणभाष यांवरून अधिकार्यांना पुरवणे कायद्यानुसार बंधनकारक नाही. व्यक्ती भ्रमणभाषवर माहिती देण्यास नकार देऊ शकते.
३ आ. चौकशीसाठी आपण दुसर्या राज्याच्या पोलीस ठाण्यात जाणे बांधील नाही.
४. लक्षात ठेवा …
४ अ. कुठलाही सरकारी अधिकारी भ्रमणभाषवर तुमची माहिती विचारत नाही. संबंधित चौकशी लिखित सूचना देऊन व्यक्तीचे घर, कार्यालय अथवा पोलीस ठाणे या ठिकाणी होऊ शकते.
४ आ. कोणत्याही अपराधासाठी तात्काळ ऑनलाईन दंड भरण्यासाठी स्वतः खात्री केल्याविना कुठल्याही प्रकारचे पैसे भरू नयेत.
४ इ. अशा प्रसंगात बनावट अधिकारी व्हिडिओ कॉल चालू ठेवून चौकशी करण्याचा आग्रह धरतात. कोणत्याही परिस्थितीत या दबावाला न फसता ठामपणे नकार द्यावा. कोत्याही कायद्यात ‘ऑनलाईन’ किंवा व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करण्याचे प्रावधान (तरतूद) नाही.
सावध रहा आणि स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका !
प्रशासन, प्रसारमाध्यमे यांद्वारे समाजाला सतर्क केले जात असतांनाही अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढीस लागल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे. १५ जून २०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘फेडेक्स घोटाळा’ कशा प्रकारे होतो आणि त्याद्वारे समाजात लोकांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे’, याची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ती https://tinyurl.com/bdhx66ne या लिंकवर उपलब्ध आहे.