पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – आर्थिक विकास महामंडळाचे (‘इ.डी.सी.’चे) सुमारे ५० कोटी रुपये थकले आहेत. ‘इ.डी.सी.’ने आतापर्यंत ४२ व्यक्तींना ६८ कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. यामध्ये राजकारणी आणि उद्योजक यांचा समावेश आहे. या ४२ पैकी १२ जणांनी त्यांचे सर्व कर्ज फेडले आहे, तर उर्वरितांनी ४९ कोटी ८२ लाख ७४ सहस्र ७१५ रुपये कर्ज बुडवले आहे. हे कर्ज ‘इ.डी.सी.’ने माफ केलेले नाही, तर थकबाकीची परतफेड अद्याप केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात दिली.
काँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी ‘इ.डी.सी.’ने किती कर्ज दिले आणि किती कर्जाची परतफेड झाली ? असा प्रश्न केला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘कर्ज थकवणार्यांमध्ये माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांचाही समावेश आहे. मिकी पाशेको यांना ३० ऑक्टोबर २००८ या दिवशी ४ कोटी रुपये कर्ज दिले होते आणि यातील २ कोटी ७६ लाख रुपये थकले आहेत. ‘इ.डी.सी.’ने २३ ऑगस्ट १९९३ या दिवशी माजी क्रीडामंत्री फ्रान्सिस्को मोन्त क्रूझ यांना ४ कोटी ६३ लाख रुपये कर्ज दिले होते आणि त्यांच्याकडून ४ कोटी ५० लाख रुपये येणे आहे. (३० वर्षे उलटूनही कर्ज वसूल न करणारी वर्ष १९९३ पासून आजपर्यंतची सर्वपक्षीय सरकारे ! आता ३० वर्षांच्या व्याजासह त्यांच्याकडून कर्ज वसूल करायला हवे ! – संपादक) राज्यातील विविध सरकारी खाती आणि महामंडळे यांनी वर्ष २०१५ ते २०२३ या कालावधीत ‘इ.डी.सी.’कडून ८५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि सुमारे ४५६ कोटी रुपयांची परतफेड केली आहे.’’
संपादकीय भूमिकाशासनाने व्याजासह कर्ज वसूल करावे, ही अपेक्षा ! |