धर्माभिमानी आणि सेवेची आवड असलेला ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. कृष्‍णा गजानन तांबट (वय १३ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. कृष्‍णा तांबट हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्‍ये कु. कृष्‍णा याची आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के आहे.’ – संकलक)

कु. कृष्‍णा गजानन तांबट
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयीची ओढ

श्री. गजानन देवीदास तांबट

‘कु. कृष्‍णाला बालपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी पुष्‍कळ ओढ आहे. तो बालपणापासून शिवरायांचे चित्रपट, नाटक, मालिका इत्‍यादी पहात असल्‍यामुळे त्‍यांच्‍या जीवनातील अनेक प्रसंग त्‍याच्‍या तोंडपाठ आहेत.

२. तो मुलांचे संघटन करतो. तो इयत्ता ७ वीत असूनही १० वीतील मुले त्‍याचे ऐकतात.

३. तत्त्वनिष्‍ठता

कोरोनाच्‍या काळामध्‍ये त्‍याच्‍या शाळेने शाळा बंद असतांनाही शुल्‍क (फी) घेतले. तेव्‍हा आम्‍ही कृष्‍णाला विचारले, ‘‘तुझे नाव शाळेतून काढूया का ?’’ तेव्‍हा तो म्‍हणाला, ‘‘जिथे प्रामाणिकपणा नाही, तिथे मला शिकायचे नाही.’’ त्‍यानंतर आम्‍ही त्‍या शाळेतून त्‍याचे नाव काढले.

४. धर्माभिमान

अ. त्‍याच्‍या नव्‍या शाळेमध्‍ये मागील वर्षी एका पुरोगामी विचारांच्‍या शिक्षकांनी वर्गामध्‍ये देवतांचे विडंबन केले, तसेच मुलांना ‘टिळा लावणे आणि गळ्‍यामध्‍ये देवाचे पदक घालणे’, यांस बंदी केली. याविषयी कृष्‍णाने आम्‍हाला सांगितले. त्‍यानंतर कृष्‍णाने त्‍या शिक्षकांना सांगितले, ‘‘यापुढे तुम्‍ही आमच्‍या देवाचा अपमान केला, तर मी माझे बाबा आणि मुख्‍याध्‍यापक यांना सांगीन.’’

आ. ‘कृष्‍णाच्‍या वडिलांचे एक मित्र अन्‍य पंथियांच्‍या प्रार्थनास्‍थळात जातात’, हे कृष्‍णाला समजल्‍यावर त्‍याने वडिलांच्‍या मित्राचे प्रबोधन केले. तो त्‍याच्‍या मित्रांचेही अन्‍य पंथियांच्‍या उत्‍सवामध्‍ये सहभागी न होण्‍याविषयी प्रबोधन करतो.

५. सेवेची आवड

अ. कृष्‍णा त्‍याच्‍या ४ – ५ मित्रांना समवेत घेऊन रामनवमी आणि गणेशोत्‍सव या कालावधीत वसाहतीतील प्रत्‍येक घरी जाऊन देवतांच्‍या नामपट्ट्यांचे महत्त्व सांगतो अन् प्रत्‍येक दरवाजाला नामपट्टी चिकटवतो. मागील ४ वर्षांपासून तो ही सेवा करत आहे. यातून सर्व मुलांना सेवेची गोडी लागली आणि त्‍यातून त्‍यांना आनंद मिळतो. ही सर्व मुले या सेवेची आतुरतेने वाट पहातात.

आ. तो माझ्‍या समवेत अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या सेवेला येतो. तेव्‍हा तो ‘प्रसाराच्‍या वेळी विषयाची मांडणी कशी करायची ?’, हे शिकतो. तो मला त्‍याविषयी काही प्रश्‍न विचारतो.

इ. तो मला भित्तीपत्रके लावण्‍याच्‍या सेवेत साहाय्‍य करतो.

६. स्‍वसंरक्षण प्रशिक्षणाची आवड

त्‍याला लहानपणापासून स्‍वसंरक्षण प्रशिक्षणाची पुष्‍कळ आवड आहे. तो स्‍वसंरक्षणाच्‍या प्रात्‍यक्षिकातील बारकाव्‍यांचा अभ्‍यास करतो आणि घरी येऊन त्‍यानुसार सराव करतो.

७. स्‍वभावदोष

भ्रमणभाष पहाण्‍यात वेळ घालवणे आणि मोठ्यांचे न ऐकणे.

– श्री. गजानन देवीदास तांबट (कु. कृष्‍णा याचे वडील), जळगाव (२०.३.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.