Hamas : हमासच्या प्रमुखपदी खालेद मेशाल इस्माईल याची नियुक्ती होणार

हानियाच्या हत्येनंतर हमासचा निर्णय

खालेद मेशाल

जेरुसलेम – हमास या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हानिया याची तेहरानमध्ये हत्या झाल्यानंतर आता त्याच्या जागी खालेद मेशाल याची नियुक्ती केली जाणार आहे. जॉर्डनची राजधानी असलेल्या अम्मान येथे वर्ष १९९७ मध्ये इस्रायलने खालेद मेशाल याची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मेशालला विषाचे इंजेक्शन देण्यात आले होते; पण तो वाचला होता. य घटनेनंतर त्याला जगभरात ओळख मिळाली. निर्वासित असतांना तो हमासचा नेता बनला.

इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर मध्यपूर्वेत तणाव !

हमासचा प्रमुख असणारा इस्माईल हानिया हा इराणचे नवे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी इराणची राजधानी तेहरान येथे आला होता. त्या वेळी त्याच्यावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करून त्याची हत्या करण्यात आली होती. इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने ही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर मध्यपूर्वेतील देशांमध्ये तणाव वाढला आहे. गाझामधील संघर्षाचे रूपांतर मध्यपूर्वेत व्यापक युद्धात होऊ शकते. इस्रायलच्या नागरिकांसाठी येणारे दिवस आव्हानात्मक असणार आहेत, असे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटले आहे.