‘दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा असलेल्या घरांमध्ये वास्तूदोष निर्माण होऊन तेथे रहाणार्‍यांचे जीवन दुःखमय होते’, याविषयी साधकाला आलेले अनुभव !  

‘मी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे एका इमारतीत रहातो. त्या इमारतीत ज्या सदनिकांचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे, त्यांच्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणींचा मी अभ्यास केला. ‘वास्तूशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेकडे नसावा; कारण ती यमदिशा आहे. त्या दिशेने यमलहरी येतात आणि घरात प्रवेश करतात अन् असंख्य वाईट घटना घडतात’, याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. प्रकाश शिंदे

१. एक कुटुंब तळमजल्यावर रहाते. त्या घरातील प्रमुखांना अकस्मात् कर्करोग असल्याचे निदान झाले आणि काही दिवसांतच त्यांचे निधन झाले.

२. कुटुंबप्रमुखांचे मूत्रपिंड निकामी होऊन त्यांचे निधन होणे आणि त्यांचा जावई व्यसनी निघाल्याने अल्प वयातच त्याचेही निधन होणे

पहिल्या मजल्यावर एक कुटुंब आहे. त्या कुटुंबप्रमुखांचे गुडघे सतत दुखत असत. वेदना न्यून व्हाव्यात; म्हणून ते सतत वेदनाशामक गोळ्या घ्यायचे. परिणामी त्यांचे मूत्रपिंड निकामी होऊन त्यांना ‘डायलिसिस’ची (टीप १) प्रक्रिया करावी लागली आणि शेवटी त्यांचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न ८ दिवसांत घाईघाईने ठरवले; परंतु त्यांचा जावई व्यसनी (दारू पिणारा) निघाला आणि अल्प वयातच जावयाचे निधन झाले. मुलीला ३ मुले आहेत आणि आता ती माहेरी आली आहे.

टीप १ – डायलिसिस : मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया.

३. गृहस्थांची पत्नी मानसिक रुग्ण असणे आणि आर्थिकदृष्ट्या घरात अडचणी असणे

पहिल्या मजल्यावरील अन्य एका सदनिकेत रहाणार्‍या गृहस्थांची पत्नी मानसिक रुग्ण आहे. ते गृहस्थ दारू पितात. आर्थिकदृष्ट्याही त्यांना अडचणी होत्या. त्यांचा स्वभाव चिडचिडा झाला होता. ते १५ – १६ वर्षे त्या सदनिकेत राहिले; पण त्यांना सुख मिळाले नाही. त्यांनी ती सदनिका सोडली आहे.

४. कुटुंबप्रमुखांचे हृदयविकारावरील शस्त्रकर्म होणे आणि त्यांची पत्नी सतत तणावात असणे

दुसर्‍या मजल्यावर एक ख्रिस्ती कुटुंब रहात होते. ते कुटुंबप्रमुख मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये (लोकल) ‘मोटरगार्ड’ (टीप २) म्हणून नोकरी करत होते. आता ते निवृत्त झाले आहेत. त्यांचे हृदयविकारावरील शस्त्रकर्म (बायपास सर्जरी) झाले आहे. त्यांना मूलबाळ नाही. त्यांची पत्नी कुणाशीही फारसे बोलत नव्हती. ती सतत तणावात असते.

टीप २ – गार्ड : रेल्वेतील प्रवासांच्या सुरक्षित आणि सुव्यवस्थित प्रवासाचे दायित्व घेणारा कर्मचारी.

५. कुटुंबप्रमुखांची पत्नी मानसिक रुग्ण असणे

दुसर्‍या मजल्यावरील अन्य एका सदनिकेत एक मराठी कुटुंब रहाते. त्यांचे कुटुंबप्रमुख कामावर असतांना पुष्कळ दारू प्यायचे. आता ते एका सत्संगाला जातात. ते दारू पित नाहीत; परंतु धूम्रपान करतात. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मधुमेह आहे. त्यांची पत्नी मानसिक रुग्णाप्रमाणे वागते. ती सतत झोपून असते आणि बर्‍याच वेळा घरात स्वयंपाक न करता अल्पाहार अन् जेवण बाहेरून आणते.

५ अ. मालमत्तेच्या संदर्भात न्यायालयात चालू असलेल्या एका खटल्यात पुष्कळ व्यय होणे आणि मुलाचे लग्न अपयशी ठरणे : त्यांचा मालमत्तेच्या संदर्भात न्यायालयात एक खटला चालू असून त्यात पुष्कळ व्यय होतो. त्यांचा एकुलता एक मुलगा सुस्वरूप आहे. तो माहिती तंत्रज्ञान (आय्.टी.) क्षेत्रात कामाला आहे. त्याला पगार चांगला आहे. त्यांनी मुलाचे लग्न घाईगडबडीत नोंदणी पद्धतीने उरकले. सासू आणि सून यांचे न पटल्यामुळे ती मुलगी कायमची माहेरी निघून गेली. मुलानेही मुलीच्या समवेत संसार करण्यास नकार दिला.

६. तिसर्‍या मजल्यावर रहात असलेल्या एका कुटुंबाने त्यांचे घर काही वर्षांतच सोडून दिले.

७. मुलगा अमेरिकेहून भारतात परत येणे; परंतु तो आई-वडिलांच्या समवेत न रहाणे आणि कुटुंबप्रमुखांचे हृदयविकारावरील शस्त्रकर्म होणे

चौथ्या मजल्यावर रहाणार्‍या एका कुटुंबातील मुलगा नोकरीसाठी अमेरिकेला गेला होता. आता तो भारतात परत आला आहे; परंतु तो आई-वडिलांच्या समवेत रहात नाही. त्या कुटुंबातील प्रमुखांचे हृदयविकारावरील शस्त्रकर्म (बायपास सर्जरी) झाले आहे आणि त्यांना व्यसन आहे.

८. कुटुंबप्रमुखांना मुलाच्या लग्नापूर्वी २ दिवस हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन होणे आणि मुलाचे लग्नही न टिकणे

चौथ्या मजल्यावरील अन्य एका सदनिकेत रहाणार्‍या एका कुटुंबाच्या प्रमुखांनी मुलाचे लग्न ठरवले आणि लग्नाच्या पत्रिका वाटण्यास आरंभ केला. लग्न २ दिवसांवर आले असतांना अकस्मात् त्यांच्या हृदयात वेदना होऊ लागल्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणांतच त्यांचे निधन झाले. सुतकानंतर कुटुंबियांनी त्या मुलाचे लग्न उरकून घेतले; परंतु ते लग्न टिकले नाही. मुलाने घटस्फोट घेतला.

८ अ. मुलाच्या दुसर्‍या लग्नाच्या वेळी त्याच्या भावाच्या डोक्यावर दगड पडून त्याला रुग्णालयात भरती करावे लागणे आणि त्याची स्मरणशक्ती न्यून होणे : तो मुलगा कामावर जात असतांना कुणाशीही बोलत नाही. त्याच्या वडिलांचे हृदयविकाराने अकस्मात् निधन झाल्याने त्याच्या आईला मानसिक त्रास आहे. काही वर्षांनी त्या मुलाने पुन्हा लग्न केले. त्याच्या लग्नाच्या वेळी त्याचा भाऊ दुचाकीवरून जात होता. तेव्हा रस्त्याच्या कडेला एका इमारतीचे काम चालू होते. त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून एक दगड खाली येऊन भावाच्या डोक्यावर पडला. त्यामुळे भावाला पुष्कळ मार लागला. ऐन लग्नाच्या वेळी भावाला रुग्णालयात भरती करावे लागले. आता त्याची स्मरणशक्ती न्यून झाल्याने तो कामावर जाऊ शकत नाही. त्याचे जीवन व्यर्थ गेल्यासारखेच आहे.

अशा प्रकारे मी रहात असलेल्या इमारतीमधील दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा असलेल्या घरांमध्ये वास्तूदोष निर्माण होऊन तेथे रहाणार्‍यांचे जीवन दुःखमय झाले आहे.

‘गुरुदेवांनीच माझ्याकडून हे अनुभव लिहून घेतले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. प्रकाश शिंदे (वय ६१ वर्षे), डोंबिवली, (जिल्हा ठाणे)(१५.८.२०२३)

घर विकत घेतांना घरातील शौचालयाची दिशा योग्य असणे आवश्यक असणे

‘मी एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिका विकत घेतली आहे. मी आमच्या ओळखीच्या पुरोहितांना विचारले, ‘‘घराच्या दिशा योग्य आहेत कि नाहीत ?’, हे सांगा.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘प्रथम घरातील शौचालयाची दिशा बघायची. शौच उत्तरेकडे पडता कामा नये, नाहीतर त्या घरात धनाची उणीव भासते आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते; कारण उत्तर दिशा ही देवांची दिशा आहे.’’

– श्री. प्रकाश शिंदे (वय ६१ वर्षे), डोंबिवली, (जिल्हा ठाणे) (१५.८.२०२३)