honourpoint.in : विंग कमांडर अफराज (निवृत्त) यांनी २६ सहस्रांहून अधिक वीरगतीला प्राप्‍त सैनिकांच्‍या माहितीसाठी बनवले संकेतस्‍थळ !

सौजन्य : honourpoint.in

बेंगळुरू (कर्नाटक) – वायूदलाचे विंग कमांडर एम्.ए. अफराज (निवृत्त) यांनी देशभरातून वीरगतीला प्राप्‍त झालेले सैनिक आणि त्‍यांचे कुटुंबीय यांची माहिती गोळा करून ‘honourpoint.in‘ या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध केली आहे. अनुमाने २६ सहस्रांहून अधिक सैनिकांची यात माहिती ठेवण्‍यात आली आहे.

निवृत्त विंग कमांडर एम्.ए. अफराज यांनी सांगितले की,

१. आमचा प्रयत्न आहे की, समाजाने अशा वीर सैनिकांना ओळखावे आणि त्‍यांच्‍या कुटुंबाच्‍या वेदना अल्‍प करण्‍यात योगदान द्यावे. याच कारणामुळे वीरमरण आलेल्‍या सैनिकांच्‍या कथा समाजासमोर आणण्‍यास प्रारंभ केला. या मोहिमेत आम्‍ही सरकारकडून कोणते योगदान घेत नाही.

२. देशात जवळपास २०० युद्धस्‍मारके आहेत; मात्र तेथेही सैनिकांची नावे, पद आणि रेजिमेंट या व्‍यतिरिक्‍त त्‍यांच्‍याविषयी अधिक काहीच माहिती नाही. शौर्य चक्र ते परमवीर चक्र विजेते यांच्‍याविषयी बरेच काही आहे; मात्र त्‍यांच्‍या कुटुंबांविषयी काहीच माहिती नाही.

३. फ्‍लाईंग ऑफिसर फारुख बुनशा वर्ष १९६५ च्‍या युद्धात वीरगतीला प्राप्‍त झाले होते. हळूहळू बुनशा लोकांच्‍या विस्‍मृतीत गेले. आम्‍ही माहिती गोळ केली तेव्‍हा त्‍यांच्‍या वाग्‍दत्त वधूनेही (विवाह ठरलेली तरुणी) संपूर्ण आयुष्‍य त्‍यांच्‍या आठवणीत व्‍यतीत केले. आता त्‍या ७५ वर्षांच्‍या आहेत. त्‍यांच्‍या कुटुंबाने त्‍यांचे नाते कधी मान्‍य केले नाही; मात्र जेव्‍हा त्‍यांची कथा आम्‍ही समोर आणली, तेव्‍हा एकमेकांचे कुटुंब भेटले.

संपादकीय भूमिका

जे सरकारला करायला हवे, ते नागरिकांना करावे लागत आहे, हे लज्‍जास्‍पद !