साधकांनो, ईश्वरप्राप्तीची मी तुम्हाला वाट दाखवली ।
पण मला माहीत नव्हते की, वाटेत कितीतरी काटेकुटे आहेत ।। १ ।।
व्यष्टीसह समष्टी साधना सांगितली ।
पण त्यामुळे तुम्हाला समाजाचा विरोध पत्करावा लागला ।। २ ।।
सत्य, त्रेता आणि द्वापर युगांत देवयान (टीप १) मार्गाने साधक मोक्षाला गेले ।
पण मला माहीत नव्हते की, कलियुगात पितृयान (टीप २) मार्गाने जावे लागते ।।३।।
पितृयान मार्ग पाताळातून जातो ।
म्हणून वर्ष २००१ पासून तुम्हाला पुष्कळ त्रास सोसावे लागत आहेत ।। ४ ।।
शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक ।
असे विविध असह्य त्रास तुम्ही भोगत आहात ।। ५ ।।
वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे आलेला आंधळेपणा, बेशुद्धावस्था ।
सर्व काही तुम्ही हसतमुखाने स्वीकारत आहात ।। ६ ।।
तुमच्यापैकी काहींना वाईट शक्तींचे त्रास झाले ।
त्या तुम्हाला तुमचे जीवन जगू देत नाहीत ।। ७ ।।
तुमच्या जागी मी असतो ।
तर सनातनला सोडून दिले असते ।। ८ ।।
असह्य त्रास असले, तरीही रात्रीचा दिवस करून ।
बेशुद्धावस्थेतही तुम्ही मिळवलेत सूक्ष्म ज्ञान ।। ९ ।।
वाईट शक्तींनी केली आक्रमणे,तरी तुम्ही हिंदु धर्माची महानता दाखवलीत ।
हिंदु धर्मातील रूढी-परंपरांची सूक्ष्म परीक्षणे रात्रंदिन केलीत ।। १० ।।
सातत्याने मोठमोठी आक्रमणे करणार्या वाईट शक्ती हरल्या ।
अन् साधकांनो, तुम्ही जिंकलात ।। ११ ।।
पितृयान मार्गाचे कलियुगातील आपण पहिला प्रवासी ।
आपल्याला सप्तपाताळांना भेदून पुढे जायचे आहे ।। १२ ।।
नाही मार्गदर्शन, नाही संदर्भासाठी ग्रंथ ।
ईश्वरावरील श्रद्धेने पुढे जायचे आहे ।। १३ ।।
आंधळे, बहिरे, मुके, अपंग अशा साधकांना घेऊन ।
स्थूल आणि सूक्ष्म यांतून लढत पुढे जायचे आहे ।। १४ ।।
पाचव्या पाताळापर्यंत आपण लढाई जिंकत आलो ।
पण वर्ष २०२३ पर्यंतच्या लढाया जास्त भीषण आहेत ।। १५ ।।
श्रीरामाला आणि पांडवांना भोगावा लागला वनवास ।
आपल्याही नशिबी आहे वर्ष २०१९ ते २०२३ पर्यंतचा वनवास ।। १६ ।।
करू प्रार्थना ईश्वराला लवकर अवतार घेण्या ।
जनतेला ईश्वरी राज्य अन् साधकांना मोक्ष देण्या ।। १७ ।।
गुरुबळावर (टीप ३) मी लढतो ।
सूक्ष्म अशा गुरुतत्त्व बळावर तुम्ही लढता ।। १८ ।।
माझ्यात नाही क्षमता तुमच्या रक्षणाची ।
तरी तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवता ।। १९ ।।
माझ्या जागी तुम्ही आणि तुमच्या जागी मी असतो ।
तर तुमच्यावर मी श्रद्धा ठेवली नसती ।। २० ।।
साधकांनो, तुम्ही जिंकलात ।
मी हरलो ।। २१ ।। (टीप ४)
टीप १ – सप्तलोकांतून ईश्वराकडे जाण्याचा मार्ग,
टीप २ – सप्तपाताळांतून ईश्वराकडे जाण्याचा मार्ग,
टीप ३ – प.पू. भक्तराज महाराज यांच्या बळावर,
टीप ४ – हनुमंताप्रमाणे समर्पणभाव असणार्यांसाठीच प.पू. डॉक्टर म्हणतात, ‘‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले (१८.६.२००६)