पुणे – परदेशी सहल आयोजित करून आस्थापनाचा बनावट शिक्का, लेटरहेड (आस्थापनाचे पत्र) सिद्ध करून त्याद्वारे ट्रॅव्हल्स आस्थापनाची (सहल आयोजित करणारे आस्थापनाची) १ कोटी ३५ लाख ९५ सहस्र ६८६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुणाल पाटील यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यावरून विपुल नवगिरे आणि पंकज मेळै यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे औंध येथील ‘फ्युचर टॉवर’ येथे ट्रॅव्हल्स आस्थापन आहे. नवगिरे आणि मेळै हे या आस्थापनामध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आस्थापनाचा विश्वास संपादन करून बनावट कागदपत्रे सिद्ध करून ग्राहकांकडून रक्कम स्वीकारून ती स्वत:च्या अधिकोषाच्या खात्यात जमा केली. ट्रॅव्हल्स आस्थापनाकडे ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये गेल्या ४ वर्षांमध्ये या दोघांनी वरील रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले.