अमेरिकेच्या संसदेत भारताच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विधेयक सादर
(नाटो म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना)
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकी काँग्रेसमध्ये (संसदेमध्ये) एक विधेयक मांडण्यात आले असून त्यात भारताला अमेरिकेच्या आघाडीच्या मित्र राष्ट्राचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. हे विधेयक अमेरिकी खासदार मार्को रुबिओ यांनी मांडले आहे. भारताच्या प्रादेशिक सार्वभौमत्वावरील वाढत्या धोके लक्षात घेता अमेरिकेने त्याचे मित्र जपान, इस्रायल, कोरिया आणि ‘नाटो’ देश यांच्याप्रमाणे भारताला महत्त्वाचे तंत्रज्ञान हस्तांतरित करावे, तसेच पाकपुरस्कृत आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य करावे, अशा मागण्या या विधेयकात केल्या आहेत.
१. मार्को रुबियो यांनी ‘यूएस् इंडिया डिफेन्स को-ऑपरेशन अॅक्ट’ या विधेयकामध्ये म्हटले आहे की, डाव्या विचारसरणीचा चीन हिंद आणि प्रशांत महासागर क्षेत्रांत सतत त्याचा प्रभाव वाढवत आहे आणि आपल्या प्रादेशिक मित्र देशांची सुरक्षा अन् सार्वभौमत्व यांना धोका निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत चीनच्या रणनीतीचा सामना करण्यासाठी अमेरिकेने त्याचे सहकार्य चालू ठेवणे आणि भारतासह या क्षेत्रातील इतर देशांना ते एकटे नसल्याचे सांगणे महत्त्वाचे आहे.
२. अमेरिकेत लवकरच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत आणि अशा वेळी अमेरिकी काँग्रेसमधील दोन्ही पक्षांच्या खासदारांमध्ये मतभिन्नता असल्याने हे विधेयक संमत होण्याची शक्यता अल्प असली, तरी अमेरिकेत भारताला मिळणारा पाठिंबा लक्षात घेता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता आहे.