Jaishankar Meets Chinese FM : पूर्वीच्या करारांचा आदर केला, तरच दोन्ही देशांतील संबंध सुधारतील !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना सुनावले !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी

व्हिएन्टिन (लाओस (थायलंडच्या शेजारील देश)) – ‘आसियान’च्या (दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या) येथे आयोजित परिषदेच्या वेळी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये सीमावादावर चर्चा झाली. या वेळी जयशंकर वांग यी यांना म्हणाले की, वातावरण स्थिर रहाणे, हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. भारत-चीन संबंध पूर्ववत् न होण्यामागे सीमावाद हे प्रमुख कारण आहे. सीमेवरील परिस्थिती जशी असेल, तसेच दोन्ही देशांमदील संबंध असतील. प्रत्यक्ष नियंत्रणरेषा आणि पूर्वीचे करार यांचा आदर केला पाहिजे, तरच दोन्ही देशांतील संबंध सुधारतील.

या महिन्यात हे दोन्ही नेते दुसर्‍यांदा भेटले. यापूर्वी कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे आयोजित ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या शिखर परिषदेच्या वेळी त्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांनी सीमाप्रश्‍नी तोडगा काढण्याविषयी, म्हणजेच दोन्ही देशांच्या सीमेवरील सैन्याची संख्या अल्प करण्याविषयी कठोर मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याचे मान्य केले.

संपादकीय भूमिका

चीनने किती काही सांगितले, तरी तो त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा सोडणार नसल्याने अशा चर्चा निरर्थकच होत !