सरखेल कान्होजी आंग्रे यांचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचा दबदबा !

२५ जुलै या दिवशी सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

सरखेल कान्होजी आंग्रे

‘प्रिन्सेस ॲन’ नावाचे जहाज वर्ष १७१८ मध्ये इंग्लंडवरून भारतमार्गे हाँगकाँगला चालले होते. जातांना भारताच्या पश्चिम किनार्‍यावर मुंबईला येऊन मग ते पुढे गेले. या जहाजाचा कॅप्टन होता निकोलस ल्यूहॉर्न. ल्यूहॉर्न याचा तसा कान्होजींशी प्रत्यक्ष कधीच संबंध वा संपर्क आला नव्हता; पण कान्होजींचे नाव त्या भागात इतके प्रसिद्ध होते की, त्याने ते नक्कीच ऐकले असावे. त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या काही नाममात्र वाटाघाटीही कान्होजी यांच्याशी चालल्या होत्या. ल्यूहॉर्नचे जहाज मुंबईजवळून जातांना त्याने एक नोंद लिहून ठेवली आहे. त्यात तो लिहीतो, ‘Several Gallivats at shore to look out, believing them to belong to Angrey whom is reckoned the greatest rogue on all this coast to everybody except the English…’ (अर्थ : किनार्‍यावर भरपूर गलबते (जहाजे) होती. बहुतेक ती (कान्होजी) आंग्र्‍यांची असावीत, (हे आंग्रे) इंग्रज सोडून इतरांसाठी या किनारपट्टीवरचे ‘सर्वांत मोठे लुटारू’ म्हणून कुप्रसिद्ध आहेत…)

श्री. संकेत कुलकर्णी

वाटाघाटी चालू असल्या, तरी कान्होजी इंग्रजांचे शत्रू होते, हे जगजाहीर होतेच; म्हणून जाता जाता त्याने ‘त्यांची (कान्होजींची) जहाजे बंदरात नेहमी संध्याकाळी बंदरात परत येतात’, ही नोंदही करून ठेवली आहे, म्हणजे कंपनीच्या आरमारास कान्होजींच्या आरमारावर आक्रमण वगैरे करायचे झाले, तर ही गोष्ट कामास येईल. एकीकडे बोलणी करत आहोत, हे दाखवून शत्रूवर बारीक पाळत ठेवायची इंग्रजांची सवयही जुनीच; पण कान्होजी आंग्रे यांचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचा दबदब्याचा नुसता अंदाजही यायला ही एका तिर्‍हाईताची छोटीशी नोंदही पुरेशी आहे. – श्री. संकेत कुलकर्णी, लंडन

(श्री. संकेत कुलकर्णी यांच्या फेसबुकवरून साभार)