‘पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांना लहानपणापासूनच देवाधर्माची आवड होती. त्यांच्या माहेरी आणि सासरीही घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांनी महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या समवेत आध्यात्मिक स्तरावर वर्षातील सण सर्वांनी मिळून साजरे करणे, एकत्रित नामजप करणे, चातुर्मासात सर्वांनी मिळून एखादा नियम पाळणे, दुपारच्या वेळेत सर्वांनी एकत्र जमून पोथी वाचन करणे, असे समष्टी कार्यही केले. या लेखात त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दांत आपण जाणून घेऊया.
(भाग १)
१. बालपण
१ अ. माझा जन्म १.११.१९३२ या दिवशी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे या गावी झाला. आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती. माझे बालपण सुसंस्कृत कुटुंबात गेले.
१ आ. लहानपणापासून देवाविषयी प्रेम आणि आवड निर्माण होणे : माझी आई (कै. लक्ष्मीबाई विष्णुपंत कुलकर्णी) आणि वडील (कै. विष्णुपंत कृष्णाजी कुलकर्णी, हिवरेकर) आध्यात्मिक वातावरणात रहाण्याचा प्रयत्न करत असत. माझे वडील चाकरीत असतांना उच्च पदावर होते, तरीही त्यांनी देवधर्म कधीही चुकवला नाही. माझी आई धर्माचरणी होती. अशा वातावरणात आम्ही ६ भावंडे मोठी झालो. आमच्यावरही तसेच संस्कार झाले आहेत. त्यामुळेच लहानपणापासून मला देवाविषयी प्रेम आणि आवड निर्माण झाली.
१ इ. माझा अध्यात्माकडे ओढा असल्याने विविध आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करता यावा, यासाठी मी परीक्षा दिल्या आणि त्यांत मी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले.
१ ई. लहानपणापासून केलेली उपासना : लहानपणी घरात परंपरेने चालत आलेल्या गोष्टी, म्हणजे प्रतिदिन सायंकाळी स्तोत्रे म्हणणे, घरात साजरे केले जाणारे सण, उत्सव यांत मोठ्यांना साहाय्य करणे, असे मी करत होते.
२. विवाहानंतर
२ अ. सर्वांशी मिळून मिसळून वागणे : आतापर्यंतच्या आयुष्यात मी कुणाशीही भांडले नाही किंवा माझ्यामुळे काही गोष्टी वाईट घडल्या नाहीत. ‘जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १०, ओवी ११८) अशी माझी दृष्टी असते. त्यामुळे माझे सासरे मला ‘तू अजातशत्रू आहेस’, असे म्हणत असत.
२ आ. घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर-सत्कार करण्यात मला पुष्कळ आनंद मिळतो. पाहुण्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालण्यात मला समाधान मिळते.
२ इ. मी वहीवर श्रीरामाचा नामजप लिहीत असे. त्या वह्या मी सज्जनगडावर जाऊन अर्पण केल्या.
२ ई. नेतृत्व आणि समष्टीभाव : माझ्या यजमानांचे विविध ठिकाणी स्थानांतर (बदली) होत असे. तेव्हा निरनिराळ्या गावांत गेल्यावर तेथील अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने मी जमेल तसे प्रयत्न करत होते. यजमानांचे स्थानांतर (बदली) होऊन आम्ही बेळगावला आलो. तेव्हा आम्ही ५० वर्षांपूर्वी रहात असलेल्या भागात महिलामंडळ चालू केले. या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या समवेत आध्यात्मिक स्तरावर सर्वांनी मिळून वर्षभरातील सण साजरे करणे, एकत्रित नामजप करणे, चातुर्मासात सर्वांनी मिळून एखादा नियम पाळणे, दुपारच्या वेळेत सर्वांनी एकत्र जमून पोथीवाचन करणे, तसेच गावात आणि जिल्ह्यात राबवल्या जाणार्या विशेष मोहिमांमध्ये सहभाग घेणे, देशकार्य करणार्यांकरता किंवा देशावर आलेल्या संकटांच्या वेळी मंडळाच्या वतीने सर्वांनी मिळून आवश्यक ते साहाय्य करणे, या आणि अशा वेगवेगळ्या स्तरांवर देवानेच आमच्याकडून कार्य करवून घेतले.
२ उ. विवाहानंतर गुरुप्राप्ती होईपर्यंत केलेली साधना : माझ्या सासरी आध्यात्मिक वातावरण होते. आमच्या घरी पुष्कळ संत जेवायला किंवा रहायला येत असत. मलाही त्यांची सेवा करणे मनापासून आवडत असे. देवाने माझ्याकडून संतसेवा करवून घेतली. संत सहवासामुळे माझ्यामध्ये मुळात असलेली अध्यात्म आणि साधना यांविषयीची ओढ वाढत गेली. त्यामुळे नामजप करणे, वेगवेगळे नियम आणि व्रते पाळणे, असे मी करत होते. घरात आधीपासूनच श्री गुरुदेव दत्ताची उपासना होत असल्याने प्रत्येक गुरुवारी आरती करणे, प्रतिदिन दत्तबावनी स्तोत्र म्हणणे, गुरुवारी उपवास करणे, ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करणे, असे मी करत होते.
२ ऊ. गुरुप्राप्ती होणे : माझ्या मनात ‘आपल्याला गुरु असावेत’, असा विचार सतत यायचा; पण ‘हे कसे शक्य होणार ?’ माझ्या सासर्यांनी मला गुरु करण्यासंदर्भात काही सूत्रे सांगितली होती. त्यामुळे ‘जेव्हा एखादी आध्यात्मिक व्यक्ती आमच्या घरी येऊन मला साधनेविषयी मार्गदर्शन करील, तेव्हा आपण ‘साधना’ चालू करायची’, असे मी ठरवले होते. श्री. जी.बी. वेल्हाळ हे भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकारी आमच्या घरी नेहमी येत असत. त्यांनी मला समोर बसवून ‘सोऽहम्’ हा मंत्र दिला. त्यानंतर नित्यनेमाने मी तो मंत्रजप भावपूर्ण करू लागले. जप करण्याचा मला जणू छंदच लागला. मी प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून ध्यानाला बसत असे आणि माळ घेऊन अनुमाने १०० माळा जप करत असे.’
मी देवपूजा, धार्मिक ग्रंथांचे वाचन इत्यादी गोष्टी नियमित करत असे. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी शरीर हेच प्रथम साधन आहे’ म्हणजेच साधनेसाठी शरीर चांगले असणे उपयोगाचे आहे, असे वचन आहे.’ या उक्तीनुसार ‘देवाने दिलेले शरीर शेवटच्या क्षणापर्यंत सुदृढ राहून हातून धमकार्यच घडावे’, अशी देवाच्या चरणी प्रार्थना आहे.’
(क्रमशः)
– (पू.) श्रीमती विजया दीक्षित, अनगोळ, बेळगाव. (१९.४.२०२४)