‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’च्या विज्ञापनामध्ये बेपत्ता व्यक्तीचे छायाचित्र !

कुटुंबीय संतप्त

ज्ञानेश्वर विष्णू तांबे (डावीकडे)

पुणे – सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील ६६ आणि उर्वरित देशातील ७३ तीर्थक्षेत्रांसाठी ही योजना लागू केली असून या योजनेचा लाभ घेणार्‍या दर्शनार्थींना ३० सहस्र रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे; मात्र या विज्ञापनात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे गावातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे छायाचित्र वापरले असल्याने बेपत्ता नागरिकाच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. ‘सामाजिक माध्यमांत प्रसारित झालेली हे विज्ञापन अधिकृत नाही’, असा खुलासा सरकारने केला असून ‘संबंधित विज्ञापन माहिती आणि जनसंपर्क कार्यालयातून प्रसारित करण्यात आले नाही’, असे सांगितले आहे. ज्ञानेश्वर विष्णू तांबे असे ३ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या नागरिकाचे नाव आहे.

ज्ञानेश्वर तांबे हे वारी, तसेच इतर तीर्थक्षेत्री दर्शनासाठी गेल्यानंतर घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी तांबे बेपत्ता झाल्याची तक्रार प्रविष्य केली नव्हती; मात्र विज्ञापनात त्यांचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.