१. हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करणे, हेच मुसलमान अन् ख्रिस्ती अनुयायांचे ध्येय
‘भारतात ख्रिस्ती आणि मुसलमान या दोन धर्मांच्या अनुयायांनी कधी शस्त्रबळावर, तर कधी प्रलोभने दाखवून हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. त्यामुळे हिंदूंच्या लोकसंख्येत लक्षणीय घट झाली. या धर्मांतरितांची शुद्धी करून त्यांना परत हिंदु धर्मात घेण्याचा प्रयत्न केला, तर लगेच आरडाओरड चालू होते. एकंदरीत या दोन्ही धर्माच्या अनुयायांना हिंदु धर्म आणि संस्कृती समूळ नष्ट करणे, तसेच भारताचे इस्लामिक अन् ख्रिस्ती राष्ट्रांत रूपांतर करणे, हे उद्दिष्ट गाठायचे आहे. हिंदूंवर अन्याय झाला, तरी त्यांनी न्याय प्रस्थापित करण्याच्या कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नांना घटनेची पायमल्ली समजली जाते. हिंदूंचे शिरकाण झाले, तरी त्यावर स्वतःला मानवतावादी म्हणवणारे समाजवादी आणि साम्यवादी लोक मिठाची गुळणी करून गप्प बसतात. त्या वेळी त्यांची बुद्धी ही ख्रिस्ती प्रचारक आणि मुसलमान यांच्या पायाशी लोळण घेऊन त्यांचे चरणांमृत सेवन करत असते.
२. हिंदूंचा इतिहास विकृत स्वरूपात मांडण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यान्वित
स्वतःला प्रकांड पंडित असे प्रमाणपत्र देऊन हिंदूंचा धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास विकृत स्वरूपात मांडण्यासाठी एक मोठी यंत्रणा हेतूतः निर्माण करण्यात आली आहे. त्यासाठी जगातील अनेक धनिक पाशवी वृत्तीला प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी एक वेगळी अर्थव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. हिंदु धर्मावर सतत टीका करणे, हिंदूंच्या सर्व श्रद्धास्थानांवर आघात करणे, ‘हिंदू अल्पसंख्यांकांना छळतात आणि त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करतात’, अशी आवई उठवणे आणि त्याला प्रतिकार करणार्या हिंदूंना तत्परतेने ‘आतंकवादी म्हणणे’, असे दायित्व स्वयंघोषित विद्वानांवर सोपवण्यात आले आहे. थोडक्यात या सर्वांच्या दृष्टीने हिंदूंवर सातत्याने होत असलेला अन्याय, हाच न्याय आहे. या अन्यायाला पराभूत करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी हिंदू धडपड करू लागले, तर लगेच ‘हिंदूंना मुसलमान आणि ख्रिस्ती यांचा ‘फोबिया’ (घृणा) झाला आहे’, अशी ओरड करण्यासाठी हे सर्व स्वयंघोषित विद्वतजन मोकळे आहेत.
३. काल्पनिक कथानककारांना नामोहरण करण्याचे हिंदूंसमोर मोठे आव्हान
सर्वसामान्य हिंदूंचा बुद्धिभेद करण्यासाठी आवश्यक असणारी प्रखर विकृत बुद्धी या विद्वानांकडे आहे. सामान्यपणे सज्जन त्यांची तल्लख बुद्धी सत्कार्यासाठी उपयोगात आणतात. तथापि विकृत बुद्धीने पीडित असलेले स्वयंघोषित विद्वान हिंदु धर्माचा नाश करण्यासाठी ती हेतूतः वापरत आहेत, असे आता अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले आहे.
काल्पनिक घटनांचे कथानक सर्वत्र प्रसारित करून समाजात संभ्रम आणि अराजकसदृश वातावरण निर्माण करण्याचे कुकर्म स्वयंघोषित प्रकांड पंडित करतांना दिसतात. त्यांच्या विरोधात सकस बुद्धीचा वापर करून त्यांना नामोहरम करण्याचे एक मोठे आव्हान हिंदूंसमोर आहे.
दुर्दैवाने हिंदूंमधील काही जणांच्या विचारांमध्ये गडबड जाणवत आहे. हीच गडबड आपल्यासाठी अहितकारक ठरू शकते. त्यामुळे आपण आपली विचारसरणी आपल्या पूर्वजांच्या विचारधारेशी सुसंगत ठेवणे नितांत आवश्यक आहे. अन्यथा आपली प्रत्येक कृती आपल्या शत्रूला अनुकूल ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी जनतेच्या मनात राष्ट्र्रभक्तीची प्रखर ज्योत निर्माण केली होती. एवढेच नव्हे, तर प्रत्येक मावळ्यांमध्ये प्रतिकारनिष्ठा निर्माण केली होती. शिवरायांच्या पदपथावरून वाटचाल करतांना हिंदु समाजातील तळागाळापर्यंत सर्वांच्या मनात प्रतिकारनिष्ठा जागवणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
४. धर्मांतर थांबवण्यासाठी लोकांमध्ये हिंदु राष्ट्रवाद जागवणे आवश्यक !
ख्रिस्ती आणि मुसलमान पंथांचे अनुयायी विविध प्रकारची प्रलोभने दाखवून हिंदूंना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करतात. त्याला शह देण्यासाठी आपल्यापैकी काही लोक सुचवतात, ‘आपणच आपल्या लोकांना प्रलोभन देऊन त्यांना हिंदूच रहाण्यासाठी प्रयत्न करावा. त्यामुळे त्यांना धर्मांतरापासून थांबवता येईल, तसेच हे प्रलोभन देतांना वनवासी क्षेत्रातील आपल्या बांधवांना विनामूल्य मद्य देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे ते मुसलमान आणि ख्रिस्ती पंथांकडून मिळणारे मद्य नाकारतील अन् ते हिंदूच रहातील.’ हा उपाय ‘रोगापेक्षा उपाय भयंकर’, असा आहे. प्रतिकारनिष्ठा निर्माण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांची आवश्यकता नसते. उलट मादक पदार्थांचे सेवन केल्याने माणूस वैचारिक, भावनिक, बौद्धिक आणि शारीरिक अशा सर्व स्तरांवर दुर्बल होतो. ही दुर्बलता राष्ट्राच्या निर्मितीसाठी उपयुक्त न ठरता मोठी अडचण ठरेल. त्यामुळे ‘हा देश माझा, हे राष्ट्र माझे आणि मी या राष्ट्राचा’, ही भावना अत्यंत तीव्रपणे हिंदूंमध्ये निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
यासमवेतच हिंदूंमध्ये आपल्या थोर ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा यांचा जाज्वल्य अभिमान निर्माण केला पाहिजे. अशा प्रकारे बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक सुदृढता निर्माण केली, तर आपला हिंदु समाज कोणत्याही बिकट परिस्थितीत कुणालाही शरण जाणार नाही. त्याचप्रमाणे विकृत मनोवृत्ती आणि बुद्धी यांनी संपन्न असलेल्या विद्वान पंडितांच्या बुद्धीभेदाला आपला सर्वसामान्य समाज भुलणार नाही. संसर्गजन्य रोग पसरला असेल, तर तो पसरवणार्या विषाणूंच्या विरुद्ध लढून स्वतःची शक्ती वाया घालवण्याऐवजी प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली की, त्या संसर्गजन्य आजारापासून आपले सहजतेने रक्षण होते. त्याच न्यायाने मन, बुद्धी आणि देह प्रतिकारक्षम झाले, तर कोणतीही बाह्यशक्ती कोणत्याही सामान्य हिंदूला भ्रष्ट करू शकणार नाही. त्या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. या सर्व प्रक्रियेचे मूळ हिंदु राष्ट्रवादात दडले आहे.
५. हिंदु राष्ट्र्रवाद राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी उपयुक्त
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ‘श्रीराम हरले’, असे सांगितले जाते. हे सांगण्यामागे ‘हिंदूंची श्रीरामांवरील श्रद्धा डळमळीत व्हावी’, हा मुख्य हेतू आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे अनुक्रमे त्रेता अन् द्वापर युगांत झाले. त्यामुळे त्या युगातील विचारांना बाजूला सारून कलियुगातील विचाराप्रमाणे हिंदूंनी वागणे सयुक्तिक ठरेल, असे सांगितले जाते. ते अर्धसत्य असून पूर्ण सत्य नाही. युग कोणतेही असले, तरी हिंदु संस्कृती ही ‘ठगाशी महाठग असावे’, अशीच शिकवण देते. राक्षसी वृत्तीला शरण जावे, अशी शिकवण हिंदु संस्कृती देत नाही. राक्षसी वृत्तीला नामोहरम करण्यातच खरा पुरुषार्थ आहे, अशी हिंदु संस्कृतीची शिकवण आहे. राष्ट्र्रवादासाठी हीच शिकवण आपल्याला उपयुक्त ठरणार आहे.
राष्ट्र्रवाद केवळ राष्ट्राच्या रक्षणासाठी उपयुक्त नसून तो संस्कृती आणि धर्म यांच्या रक्षणासाठीही तेवढाच उपयुक्त ठरतो. हे या कलियुगात आर्य चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी महाराज, यशोवर्मा, शालिवाहन, सम्राट विक्रमादित्य यांसारख्या महान वीर पुरुषांनी आपल्या कृतीतून शिकवली आहे. या वीर पुरुषांचे चारित्र्य आणि कार्य यांकडे पाठ फिरवून आपण वेगळीच विचारसरणी स्वीकारून वाटचाल करू लागलो, तर आपण यशाच्या शिखराकडे न जाता विनाशाच्या गर्तेत गाडले जाऊ.
६. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना हिंदु ‘फोबिया’ !
मुसलमान आणि ख्रिस्ती यांना ‘हिंदु फोबिया’ (तीव्र स्वरुपाची भीती वाटणे) झाला आहे. यामागील कारण असे की, नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून त्यांनी राष्ट्र्रहिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यास आरंभ केला. त्यांनी हिंदु राष्ट्र्रवादाला अनुसरून राज्यकारभार चालू झाल्याचे कलम ३७० आणि ३५ अ (जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम) हे राज्यघटनेतून काढून दाखवून दिले. त्यांनी तिहेरी तलाकही कायद्यातून काढला. श्रीराम जन्मभूमीवर श्रीरामाच्या मालकी हक्काचा शिक्का मारला आणि त्या ठिकाणी पुनश्च भव्य श्रीराममंदिर उभारले. त्यामुळे मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाच्या उरात धडकी भरली आहे. मोदींच्या हातात भारताचा राज्यकारभार जाऊ नये; म्हणून सगळे विरोधक एकत्र आले; पण सर्व विरोधकांना एकत्रितपणे सत्ता स्थापन करता येईल एवढ्या प्रमाणात बहुमत संपादन करता आले नाही. त्यामुळे जनतेने भारताची राजसत्ता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपुर्द केली.
मुसलमान आणि ख्रिस्ती पंथाच्या अनुयायांना भारतात त्यांची राजकीय सत्ता प्रस्थापित करायची आहे. त्यात नरेंद्र मोदी हा मोठा अडथळा आहे. त्यामुळेच मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाचा जीव कासावीस झाला आहे; म्हणून तथाकथित स्वयंघोषित विद्वानजन संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी हिंदूंचा बुद्धिभेद करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या उपयोगात आणणे चालू केले आहे. ‘त्यांना हिंदूंचा फोबिया झाला आहे, हे न स्वीकारता हिंदूंना मुसलमान आणि ख्रिस्ती यांचा फोबिया झाला आहे’, अशी हाकाटी पिटण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणतेही प्रलोभन, चाणाक्षपणे लिहिलेले लेख आणि दृकश्राव्य साहित्य यांना न भुलता आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी आपण सजग राहिले पाहिजे. हा राष्ट्र्रवादच हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज यांचा प्राण आहे.
‘हंता रावण का है अपना रामवीरवर सेनानी ।
कर्मयोग का देव है स्वयं कृष्ण सारथी अभिमानी ।
भारत तेरे रथ को सेना कौन रोकने वाली है ।
फिर देर क्यू उठो भाई हमी हमारे वाली है ॥’
– स्वातंत्र्यवीर सावरकर
आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या काव्यपंक्ती लक्षात ठेवल्या पाहिजेत; कारण त्याच आपल्याला या बिकट काळात मार्गदर्शक ठरणार आहेत. याहून अधिक सांगणे न लागे !’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली.