४ आस्थापनांची २७ सहस्र कोटी रुपयांची निविदा कायम !

सरकारकडून ‘प्रीपेड मीटर’ रहितची घोषणा !’

स्मार्ट प्रीपेड मीटर (प्रतीकात्मक छायाचित्र)

छत्रपती संभाजीनगर – नागरिकांचा प्रचंड विरोध झाल्याने ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बसवणार नसल्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलतांना ‘नागरिकांच्या घरी नाही, तर केवळ सरकारी कार्यालयांमध्ये हे मीटर बसवणार’, असे सांगितले.’ विधीमंडळातही याविषयी त्यांनी घोषणा केली; मात्र अदानींसह ४ आस्थापनांना दिलेल्या २ कोटी २५ लाख मीटरच्या ६ निविदा अद्याप रहित केलेल्या नाहीत. या निविदा तब्बल २७ सहस्र कोटी रुपयांच्या आहेत.

विशेष म्हणजे प्रीपेड मीटरविषयी महावितरणला आतापर्यंत कोणतेही आदेश अधिकृतपणे मिळालेले नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय सरकार घेणार का ? अशी शंका उपस्थित केली जात आहे. राज्यात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ६ निविदा काढण्यात आलेल्या होत्या. यातील १ कोटी १६ लाख मीटरचे सर्वांत मोठे कंत्राट अदानींना मिळालेले आहे.

नागार्जुन कन्स्ट्रक्शन आस्थापनाला (एन्.सी.सी.) ५७ लाख मीटरच्या २ निविदा, माँटे कार्लो आस्थापनाला ३० लाख ३० सहस्र मीटरची १ निविदा आणि जीनस आस्थापनाची २१ लाख ७६ सहस्र मीटरची १ निविदा अंतिम झालेली आहे. महावितरण आस्थापनाने काढलेल्या निविदांना ७ ऑगस्ट २०२३ या दिवशीच मान्यता मिळाली असून त्यानुसार संबंधित पुरवठादारांना संमतीपत्रही देण्यात आले आहे.