पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये २ लाख नवीन आणि वाढीव बांधकामांची नोंद नसल्याचा महापालिकेचा अंदाज आहे. सर्वेक्षणात केलेल्या मालमत्तांची कर आकारणी करण्यात येत आहे. यासाठी मालमत्ताधारकांना विशेष नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्या मालमत्ताधारकांना कर आकारणींवर हरकत, आक्षेप असतील, त्यांनी सुनावणीसाठी सुविधा केंद्रावर जाऊन आक्षेप नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिकेच्या कर संकलन कार्यालयात ६ लाख ३० सहस्र नोंदणीकृत मालमत्ता आहेत. महापालिका हद्दीमध्ये अनेक नोंदी नसलेल्या मालमत्ता आहेत, असा अंदाज घेऊन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी वाढीव अशा मालमत्तांचा ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ‘स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि.’ या आस्थापनाची नियुक्ती केली. त्यांनी केलेल्या पहिल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आलेल्या वाढीव; परंतु नोंदी नसलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस जारी करण्यात आली आहे.