पुणे शहरातील मुख्य ३२ रस्त्यांवर वाहतूककोंडी न्यून करण्यासाठी ‘अभिनव योजना’ राबवणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी, यासाठी वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्या समन्वयातून शहरातील प्रमुख ३२ रस्त्यांवरील चौकांमध्ये (सिग्नल) वाहतुकीमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘अभिवन योजना’ राबवण्यात येणार आहे. ‘गूगल’सोबत करार करून वाहतुकीसाठी स्वतंत्र ‘भ्रमणभाष अ‍ॅप’ सिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ विभाग) अनिरुद्ध पावसर यांनी १८ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडीमुळे वाहतुकीची गती संथ होते. त्याचा ताण शहरातील अंतर्गत रस्त्यांवर होतो. मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी चौकांमध्ये सुधारणा, अद्ययावत सिग्नल यंत्रणा, पार्किंग (वाहनतळ) व्यवस्थापन, गतीरोधक, रस्त्यांची रचना, रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे, वाहतूक नियंत्रणाची साधने बसवणे, ‘मिसिंग लिंक’ पूर्ण करणे, पाणी साठणार्‍या रस्त्यांची दुरुस्ती, नो-हॉकर्स झोन (किरकोळ विक्रेतामुक्त विभाग), रस्त्यांवर अडथळा आणणार्‍या आस्थापनांवर कारवाई अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मानवी आणि अभियांत्रिकी चुकांमुळे होणार्‍या अपघातांचे प्रमाण अल्प करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. जखमींना उपचार मिळण्यासाठी लागलेल्या कालावधींविषयी विश्लेषण करण्यासाठी ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’चे साहाय्य घेण्यात येणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी सांगितले.