विविध सेवांच्या माध्यमातून गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६५ वर्षे) !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु यांनी त्यांच्या साधनेला केलेला आरंभ आणि केलेल्या सेवा यांविषयी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी जाणून घेऊया. (भाग १)

श्रीमती पूर्णिमा प्रभु

१. बहिणीच्या माध्यमातून सनातन संस्थेच्या संपर्कात येणे

‘वर्ष १९८४ मध्ये माझे लग्न झाले. मी मुंबईत खार येथे रहायचे. माझ्याकडे बंगला, गाडी, तसेच सगळ्या सुखसोयी होत्या; पण मला आनंद मिळत नव्हता. माझी बहीण सौ. सुरेखा केणी बेंगळुरू येथे रहायची. ती ‘आय.डी.बी.आय.’ या अधिकोषात नोकरी करत होती. ती कधी कधी कार्यालयीन कामानिमित्त मुंबईला यायची. तेव्हा ती आमच्याकडे रहायची. वर्ष १९९० मध्ये ती सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागली. तेव्हा ती आम्हाला नामजपाविषयी सांगायची. तिने सांगितल्याप्रमाणे मी नामजप चालू केला.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट

वर्ष १९९५ मध्ये माझी बहीण सुरेखा मला प्रथमच मुंबई येथील सेवाकेंद्रात घेऊन गेली. तेव्हा गुरुदेवांनी मला कुलदेवतेचे नाव विचारले आणि कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगितले. त्यानंतर माझा नामजप चांगला होऊ लागला.

३. परात्पर गुरु डॉक्टरांना समस्या सांगितल्यावर त्या लगेच सुटणे

एकदा मी गुरुदेवांना म्हणाले, ‘‘मला एक मुलगा आहे; पण ‘मुलगी व्हावी’, असे वाटते.’’ जून १९९६ मध्ये मला मुलगी झाली. त्या वेळी गरोदर असतांना मी पुष्कळ नामजप केला. मुलगी पुष्कळ सात्त्विक, हुशार, शांत आणि प्रेमळ आहे. पुढे पुढे मी समस्या घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांकडे जायचे. मी गुरुदेवांना समस्या सांगितल्या की, त्या लगेच सुटायच्या. खरेच माझे भाग्य थोर; म्हणूनच मला गुरुदेवांचा सत्संग मिळाला आणि माझ्या जीवनाला खरी दिशा मिळून मी आनंदात रहायला शिकले.

४. ‘मुंबईहून बेंगळुरूला झालेले स्थलांतर’,  हे साधिकेची साधना चांगली होण्यासाठी देवाने केलेले नियोजन असल्याचे लक्षात येणे

मुंबईमध्ये आमचा व्यवसाय नीट चालत नव्हता. माझे यजमान श्री. अशोक प्रभु यांना बेंगळुरू येथे मोठी कामे मिळायला लागली; म्हणून वर्ष १९९९ मध्ये आम्ही बेंगळुरूला स्थलांतरित झालो. ‘माझी सेवा आणि साधना होण्यासाठी हा पालट झाला. हे देवाचेच नियोजन होते’, असे माझ्या लक्षात आले. देवाने मला अगदी फुलासारखे उचलून मुंबईहून बेंगळुरूला आणले होते. मला माझ्या मधल्या बहिणीच्या (सौ. सुरेखा केणी हिच्या) घराजवळच घर मिळाले. माझ्या सगळ्या अडचणी देवाने चुटकीसरशी सोडवल्या होत्या. केवळ माझ्याच नव्हे, तर माझे पती श्री. अशोक प्रभु, मुलगा अभिषेक, मुलगी ऐश्वर्या या सगळ्यांच्याच आयुष्याला एक नवी दिशा मिळाली होती. ‘देवाला सगळ्यांचीच काळजी आहे’, असे मला जाणवले.

५. बेंगळुरूला आल्यावर बहिणीच्या समवेत सेवेला आरंभ करणे

माझी मधली बहीण सौ. सुरेखा केणी अध्यात्मप्रसाराची सेवा करत असे. तेव्हा मी सेवा म्हणून तिला माझ्या गाडीने प्रसाराच्या सेवेसाठी घेऊन जायचे. एकदा तिने मला एका योगवर्गासाठी प्रवचन करायला लावले आणि त्या प्रवचनाची काही सिद्धता नसतांना मी ते प्रवचन सहजरित्या करू शकले. सगळे जण शांत चित्ताने ऐकत होते. ‘हे कसे शक्य आहे ?’, असा विचार मनात येऊन मला आश्चर्य वाटले. ‘माझी बहीण सतत आनंदी कशामुळे असते ?’, हे मला शिकायला मिळाले.

६. ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने गोळा करण्याची सेवा करणे

माझ्याकडे जिल्ह्यातील विज्ञापने आणि अर्पण गोळा करण्याच्या सेवेचे दायित्व होते. वर्ष १९९९ मध्ये कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले आणि गुरुपौर्णिमा विशेषांकासाठी पहिल्यांदा विज्ञापने गोळा करण्याची सेवा चालू झाली.

माझे पती श्री. अशोक प्रभु यांची ‘ऑफिस इंटिरियर डिझाईन’ची फर्म होती. त्यांची पुष्कळ उद्योजकांशी ओळख होती. मीही प्रतिदिन कार्यालयात जायचे. त्या वेळी माझ्या सगळ्यांशी ओळखी होत असत. सगळे जण व्यवसायातील किंवा वैयक्तिक समस्या सांगायचे. तेव्हा मी सगळ्यांना नामजपाचे महत्त्व सांगायचे. त्या सर्वांनी हळूहळू अर्पण आणि विज्ञापन देणे चालू झाले. देवाच्या कृपेने मोठी विज्ञापने मिळत गेली.’

– श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६५ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक.   (२७.६.२०२२)                   

(क्रमशः)

या पुढील भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/816512.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक