ब्राह्मण समाजातून होत आहे मागणी !
पिंपरी (जिल्हा पुणे) – राज्यातील ४५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या ही निर्णायक आहे. त्यापैकी ‘किमान ३० मतदारसंघांमध्ये ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळावी’, अशी आग्रही मागणी करण्याची भूमिका ब्राह्मण समाजाने घेतली आहे. मुंबईत २७ जुलै या दिवशी होणार्या प्रमुख ब्राह्मण नेत्यांच्या बैठकीकडे संपूर्ण ब्राह्मण समाजाचे लक्ष लागले आहेत. महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे; मात्र पक्षाकडून समाजाची नेहमीच उपेक्षा झाली आहे, असाही मतप्रवाह ब्राह्मण समाजात वाढत आहे.
ब्राह्मण समाजाला शिक्षणात, नोकरीमध्ये कुठेही आरक्षण नाही. कष्ट, बुद्धीमत्ता आणि गुणवत्ता यांच्या जोरावर ब्राह्मण समाज स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे. या समाजाला गृहित धरण्याची चूक यापुढे भाजपने करू नये, अशी अपेक्षा ब्राह्मणांकडून व्यक्त होत आहे. ब्राह्मण समाजातील कार्यकर्त्यांनी आयुष्यभर ‘कार्यकर्ता’ म्हणूनच राबायचे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ब्राह्मण समाजाने आतापर्यंत संघर्ष नको, म्हणून पुष्कळ त्याग केला. ‘ब्राह्मण समाज कमकुवत आहे, त्यांच्यात संघर्ष करण्याची शक्ती नाही’, असा कुणीही गैरसमज करून घेऊ नये, अशीही चेतावणी ब्राह्मण समाजातून केली जात आहे.