मुंबई, १६ जुलै (वार्ता.) – राज्यात भाजपचे सरकार असतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात वर्ष २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्षलागवडीचे ध्येय ठेवून मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. त्यांना ‘क्लीन चीट’ देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत या मोहिमेच्या चौकशीची घोषणा केली होती. या चौकशी समितीने अहवाल सादर केला असून या मोहिमेमध्ये कुठलीही अनियमितता किंवा अपहार नसल्याचे म्हटले आहे, तसेच ही मोहीम यशस्वी झाल्याचेही या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या अहवालामध्ये छोट्या रोपांऐवजी मोठी रोपे लावण्याची शिफारस करण्यात आली आहे, तसेच राज्यात या मोहिमेच्या अंतर्गत ५२ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे म्हटले आहे.