अस्वच्छता आणि लूट यांमुळे पैठण परिसरात दशक्रिया विधीचे प्रमाण निम्म्याने घटले !

अस्वच्छता आणि लूट यांमुळे पैठण परिसरात दशक्रिया विधीचे प्रमाण निम्म्याने घटले

पैठण (छत्रपती संभाजीनगर) – पैठण येथील गोदाघाट परिसराचे दशक्रिया विधीसाठी मोठे महत्त्व आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून परिसरातील अस्वच्छता आणि शहरातील ७ नाल्यांचे प्रदूषित पाणी गोदावरीच्या पात्रात येत आहे. त्यामुळे दशक्रिया विधीसाठी येणार्‍या नातेवाइकांची मोठी गैरसोय झाली. वाहनतळ परिसरात लूट, तसेच कावळ्याला घास देण्यासाठी अनधिकृत लोकांकडून १०० ते २०० रुपये घेऊन नातेवाइकांची लूट होत असल्याने दिवसाला होणार्‍या ४० ते ४५ दशक्रिया विधी आता १५ ते २० वर आल्या आहेत. सोयी-सुविधांमुळे लोकांचा कल जिल्ह्यातील कायगाव टोकाकडे वळल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर आले आहे. स्थानिक प्रशासनाने यावर बोलणे टाळले आहे.

दशक्रिया विधीसाठी येणार्‍या नागरिकांना सुविधा मिळत नाहीत ! – समीर शुक्ल, दशक्रिया विधी पुरोहित

पैठण येथे दशक्रिया विधीसाठी येणार्‍या नागरिकांना कोणतीही सुविधा मिळत नाही. गोदावरीचे दूषित पाणी, स्वच्छतेचा अभाव, वाहनतळ नसणे, प्रतिष्ठान महाविद्यालयामागील बंधारा फुटण्यास जवळपास १८ वर्षे होऊनही हा बंधारा बांधण्यात आला नाही. त्यामुळे गोदावरी नदीत पाणी थांबत नाही. या सर्व कारणांमुळे शहरात दशक्रिया विधींचे प्रमाण घटले आहे.

प्रदूषित गोदावरील नदीतील पाण्याचा अंगावर परिणाम होतो ! – परमेश्वर मिरदे, टोप्यांचे व्यापारी

पैठण शहरातील दशक्रिया विधीत अनुमाने ५० ते ६० टक्के प्रमाण न्यून झाले आहे. गोदावरी नदीत अंघोळ केल्यावर अंगावर होत असलेले परिणाम, येथील कावळ्यांच्या संख्येत लक्षणीय घट अशा अनेक कारणांमुळे दशक्रियेला येणारे नागरिक इतर ठिकाणी दशक्रिया विधी करण्यास पसंती देतात. यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होत आहे.

संपादकीय भूमिका

दशक्रिया विधीच्या ठिकाणी अस्वच्छता ठेवून सुविधा न देणार्‍या प्रशासनाने हिंदु धर्मियांनी वेळीच खडसवायला हवे !