जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी भावविभोर !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीच्या रिंगण सोहळ्यात धावणारे अश्व

सोलापूर – ‘चला पंढरीसी जाऊ, बाप रखुमा देवीवरा पाहू’, ‘ज्ञानेश्वर माऊली-तुकाराम’, ‘जय जय रामकृष्ण हरि’, असा हरिनामाचा गजर करत भक्तीरसात चिंब न्हाऊन गेलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने १२ जुलैला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचे स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. या स्वागतानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले.

पालखी सोहळ्यावर जे.सी.बी.तून पुष्पवृष्टी !

नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.३० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. या वेळी संत तुकाराम महाराजांचा अश्व आणि पादुका यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

पालखी सोहळ्यातील पादुकांचे दर्शन घेतांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

नेत्रदीपक रिंगण सोहळा !

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी

पताका, हंडे-तुळशी, विणेकरी, मृदंग आणि टाळकरी यांचे रिंगण झाले. अश्वांचे पूजन झाल्यावर अश्व रिंगणात धावले. अश्वांचे रिंगणातील धावणे पहाणे, ही उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली.