पुणे – प्रवाशांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी प्रत्येक आगारामध्ये सप्ताहाच्या सोमवारी आणि शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. पुणे विभागात येत्या १५ जुलै या दिवसापासून हा दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली आहे.
बसस्थानक, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे स्वच्छ, निर्जंतूक आणि व्यवस्थित असावीत. सर्व बसगाड्या स्वच्छ असाव्यात आणि वेळापत्रकानुसार मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेल्या थांब्यांवर बस थांबवावी, चालक-वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे, अशा अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.