मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – समाजापुढे सध्या अमली पदार्थांचे मोठे आव्हान असून हा चिंतेचा विषय आहे. केंद्र सरकारनेही या अनुषंगाने बैठक घेऊन सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना संयुक्त कृती आराखडा दिला आहे. त्यानुसार अमली पदार्थांची विक्री आणि सेवन रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. सदस्य अशोक उपाख्य भाई जगताप यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,…
१. डार्कनेट (विशिष्ट स्वरूपाचे नेटवर्क), कुरियर, थेट संदेश, इन्स्टाग्राम, फेसबुकवरील संभाषण अशा विविध माध्यमांतून अमली पदार्थांची विक्री केली जाते. हे रोखण्यासाठी संबंधित विविध विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. कुरियर आस्थापने, टपाल या यंत्रणांना कुरियरचे स्कॅन कसे करावे याविषयीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२. निर्यात होणार्या मालामध्ये कंटेनरमध्ये खाली अमली पदार्थ ठेवले जात असल्याचे आढळून आल्याने बंदरांनाही सतर्क करण्यात आले आहे. आता ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ हाती घेण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात सर्व संबंधित विभागांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
४. अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणात पोलिसांचा सहभाग आढळला, तर आता निलंबनाऐवजी त्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे. आतापर्यंत ६ पोलिसांना बडतर्फ केले आहे.