१. हिमोग्लोबिनचे प्रमाण न्यून झाल्यावर नामजपाचे उपाय करतांना साधिकेला सुचलेला भावप्रयोग
१ अ. रक्तातील ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण न्यून झाल्यामुळे उपचारार्थ सांगितलेला नामजप करतांना एका हाताची बोटे दुसर्या हाताच्या नाडीवर ठेवून न्यास करणे : ‘गुरुकृपेने उपायांचा नामजप करतांना गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) कसा भाव ठेवायचा ?’, हे मला सुचवले. माझ्या शरिरात ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण न्यून झाल्याने मला ‘श्री हनुमंत, श्रीराम आणि श्री गणेश’ या देवतांचा एकत्रित जप करायला सांगितला होता. ‘नामजप करतांना तर्जनी, अनामिका आणि मधले बोट अशी ३ बोटे डाव्या हाताच्या नाडीवर ठेवावीत’, असा विचार माझ्या मनात आला. उजव्या हाताने डाव्या हातावर आणि हात दुखू लागल्यावर डाव्या हाताने उजव्या हातावर बोटे ठेवून मी नामजप करत होते.
१ आ. नामजप करतांना ‘३ बोटे म्हणजे सनातनचे तीन गुरु आहेत’, असा भाव ठेवल्याने नामजप भावपूर्ण होऊन आनंद मिळणे : उपायांचा नामजप करतांना ३ बोटांपैकी मधले बोट परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आणि आजूबाजूची बोटे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची आहेत’, असा मी भाव ठेवला. त्या वेळी ‘पहिल्यांदा ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप करतांना तर्जनीतून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून हनुमंत स्वरूप दास्यभक्तीचे अमृत मला मिळत आहे’, असे मला वाटले. ‘मधल्या बोटातून प्रत्यक्ष गुरुदेवांचे श्रीरामस्वरूप तत्त्व माझ्या देहामध्ये प्रवाहित होत असून माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप रक्तातील थेंबाथेंबावर अंकित होत आहे’, असे मला वाटले. ‘तिसरा ‘श्री गणेशाय नमः ।’ हा नामजप करतांना श्रीराम तत्त्व आणि हनुमंत तत्त्व माझ्या देहात प्रवाहित करण्यासाठी त्यातील अडथळे दूर करण्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ अनामिकेतून प्राणशक्ती देत आहेत’, असे वाटून माझा नामजप भावपूर्ण झाला. उपाय झाल्यानंतर मला आनंद मिळाला.
गुरुदेवांनी भावप्रयोग सुचवून माझ्याकडून कृती करवून घेतली; म्हणून त्यांच्या चरणी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई अन् श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून अखंड प्रवाहित होणारा गुरुभक्तीरस ग्रहण करणे म्हणजे अमृतभेट !
२ अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सुवर्णापेक्षाही महान असा गुरुभक्तीरस अखंडपणे प्रवाहित होत असल्याचे जाणवणे : प्रायश्चित्त म्हणून एकवीस वेळा ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करतांना ‘श्रीसूक्तामध्ये श्री महालक्ष्मी देवी ‘सुवर्णरजतस्रजाम् ।’ (श्रीसूक्त, ऋचा १) म्हणजे ‘सुवर्णमिश्रित चांदीची माला धारण करणारी ’, असे म्हटले असल्याचे मला स्मरण झाले. ध्यानमंदिरातील श्री महालक्ष्मीच्या चित्राकडे माझे लक्ष गेल्यावर मला हे आठवले. त्या वेळी मी देवीला प्रार्थना केली, ‘मला केवळ विष्णुस्मरण अखंड घडेल’, एवढाच आशीर्वाद दे.’ त्या वेळी मला वाटले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या महालक्ष्मीस्वरूप आहेत. त्यांनी सुवर्णापेक्षाही महान अशी ‘गुरुभक्तीमाला’ अखंड धारण केली आहे. त्यामुळेच त्या जिथे आहेत, तिथे त्या भक्तीमालेतून साधकांकडे अिवरतपणे गुरुभक्तीरस प्रवाहित होत असतो. दूर रहात असलेल्या साधकांनी त्यांचे भक्तीपूर्ण स्मरण केल्यावर त्यांनाही त्या भक्तीरसाची अमृत भेट मिळते.’
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून अखंड प्रवाहित होणारा गुरुभक्तीरस साधकांना त्यांच्या स्वभावदोषांमुळे ग्रहण करता येत नसल्याने साधिकेने प्रार्थना करणे : ‘आपण श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची गुरुभक्ती अन् गुरुनिष्ठा यांचे जितक्या भावपूर्ण स्मरण करू, तेवढा गुरुभक्तीरस आपल्या पेशीपेशींमध्ये जात असतो; परंतु आपल्यातील स्वभावदोषांमुळे तो घेण्यात आपण उणे पडतो’, असे मला वाटले. एकदा भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘वातावरणातील गुरुतत्त्व ग्रहण करूया आणि आपल्या पेशीपेशींमध्ये ते सामावून घेऊया.’’ सत्संगाच्या वेळी ही क्रिया स्थुलातून वाणीद्वारे होते. एरव्ही त्यांच्याकडून अखंडपणे गुरुभक्तीरस साधकांना प्रसादरूपात प्राप्त होतच असतो. परात्पर गुरुदेव या माध्यमातून आपल्यावर कृपा करत आहेत; पण आपण अपूर्ण आहोत. आपण ते पूर्णपणे घेऊ शकत नाही. अनंतहस्ताने देणार्या कृपाळू गुरुमाऊलीविषयी म्हणावेसे वाटते, ‘देणार्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी !’
‘हे परात्पर गुरुदेव, आम्हाला तुमच्याकडून भक्ती, चैतन्य, निरपेक्ष प्रेम आणि आनंद घेता येऊ दे. यामध्ये आडवे येणारे आमचे स्वभावदोष आणि अहं यांचे लवकरात लवकर निराकरण करून आम्हाला तुमच्या चरणी सामावून घ्या. एवढी आर्त प्रार्थना आपल्या चरणी आहे. तुम्ही शिकवलेली साधना अनेकांपर्यंत पोचवण्याची शक्तीही तुम्हीच आम्हाला द्या. एवढीच प्रार्थना ! कृतज्ञता गुरुमाऊली कृतज्ञता !’
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (वय ५१ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) नंदुरबार. (१५.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |