अष्टविनायक देवस्थान येथे भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात !

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांची सूचना !

आढावा बैठकीत डॉ. नीलम गोर्‍हे (मध्यभागी)

मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – राज्यातील अष्टविनायकांच्या देवस्थानी भाविकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिल्या. त्यांच्या दालनात १० जुलै या दिवशी अष्टविनायक देवस्थान, एकवीरा आणि पुणे येथील तारकेश्वर मंदिर देवस्थानातील सुरक्षितता यांविषयी झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

उपसभापती डॉ. गोर्‍हे म्हणाल्या की,…

१. स्थानिक प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट यांनी समन्वयाने काम करून भाविकांना सोयीसुविधा पुरवाव्यात. यामुळे भाविकांना आंनददायी वातावरण सिद्ध झाले पाहिजे.

२. देवस्थानच्या सुरक्षेसाठी काळजी घ्यावी. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देतांना मंदिराच्या प्रथा-परंपरा जपाव्यात.

३. प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था असावी. घनकचरा व्यवस्थापनासह वाहनतळ व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्याव्यात.

४. देवस्थान ट्रस्टच्या अतिरिक्त भूमी चांगल्या सार्वजनिक उपक्रमांसाठी वापराव्यात. तेथील दळणवळणाची व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांची देखभाल करण्यात यावी. अष्टविनायक मंदिर आणि परिसर चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे.

५. भाविकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात यावी. देवस्थानाकडे जाणार्‍या रस्त्यांवर सूचना फलक, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी. देवस्थान विकासकामांसाठी आवश्यक ते प्रस्ताव सादर करावेत, म्हणजे संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची व्यवस्था करता येईल.

देवस्थानच्या विविध समस्या सोडवण्यासाठी विशेष पुढाकार घेत असल्याविषयी अष्टविनायक देवस्थानाच्या शिष्टमंडळाच्या वतीने डॉ. गोर्‍हे यांचा सत्कार करण्यात आला.