Siddaramaiah in Land Scam : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भूमी घोटाळ्याचे गंभीर आरोप !

हानीभरपाईसाठी बनावट कागदपत्रे बनवल्याचा ठपका !

मुख्यमंत्री सिद्धरामय्या

नवी देहली – ‘म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी’कडून (‘मुडा’कडून) हानीभरपाईसाठी बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याच्या प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या स्नेहमोयी कृष्णा यांनी सिद्धरामय्या, पत्नी पार्वती, मेहुणा मल्लिकार्जुन स्वामी, जमीनदार देवराज आणि अन्य ६ जण, अशा एकूण ९ जणांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

तक्रारीमध्ये उपायुक्त, तहसीलदार, उपनिबंधक आणि ‘मुडा’च्या अधिकार्‍यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याखेरीज स्नेहमोयी कृष्णा यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्य सचिव आणि महसूल विभागाचे प्रधान सचिव यांनासुद्धा पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

काय आहे आरोप ?

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पत्नी पर्वती आणि त्यांचे नातेवाईक यांनी ‘मुडा’च्या अधिकार्‍यांच्या संगनमताने ‘५०:५० भूमी वितरण योजने’च्या अंतर्गत महागड्या जागा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सिद्ध केली. भाजपनेही या प्रकरणी राज्यातील काँग्रेस सरकारला विरोध करण्यास चालू केले आहे.

‘५०:५० भूमी वितरण योजने’च्या माध्यमातून अपव्यवहार !

वर्ष २०२१ मध्ये सिद्धरामय्या यांच्या पत्नी ‘मुडा’ योजनच्यात लाभार्थी होत्या. या योजनेच्या अंतर्गत ‘मुडा’ कोणत्याही भूमीवर निवासी संकुल विकसित करण्यासाठी भूमी संपादित करण्यास सक्षम होती. ‘संपादनाच्या बदल्यात भूमीच्या मूळ मालकांना विकसित ठिकाणी ५० टक्के भूमी दिली जाईल’, असा नियम होता. या अंतर्गत झालेला भूमी वाटप घोटाळा एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने उघडकीस आणला. गेल्या ४ वर्षांत ५०:५० योजनेअंतर्गत ६ सहस्रांहून अधिक भूमींचे वाटप करण्यात आले आहे. यांतर्गत ज्या भूमी मालकांची भूमी ‘मुडा’ने संपादित केली, त्यांना मोबदला म्हणून अधिक किंमतीच्या पर्यायी जागा दिल्या गेल्या.

संपादकीय भूमिका 

काँग्रेस म्हणजे घोटाळे अथवा भ्रष्टाचार, असे सार्वकालिक समीकरण आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्यावरील आरोपांत तथ्य आढळल्यास आश्‍चर्य वाटायला नको !