भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, चारही वर्णांतील लोक असलेल्या समाजाचे महत्त्व, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्‍या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता, भारतातील हिंदु आणि मुसलमान ही २ राष्ट्रे नसल्याचे (अ)ज्ञान, हिंदु-मुस्लिम ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते, गांधी आणि बॅ. जीना यांच्या विचारांचे सार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

या पूर्वीचा लेख आपण येथे वाचू शकता : https://sanatanprabhat.org/marathi/812702.html

(लेखांक २१)  

प्रकरण ४

पू. प्रा. सु.ग. शेवडे

१. अखंड भारतातील द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आजही देशाला भोवणे

भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७६ वर्षे होऊन गेली. बॅ. जीना म्हणाले होते, तेच खरे होते. हिंदु आणि मुसलमान ही मूलतःच परस्परविरुद्ध घटकांनी बनलेली २ राष्ट्रे आहेत. मूळच्या हिंदुत्वामुळे मुसलमानांत आजही अनेक सांस्कृतिक खुणा आढळतात; पण त्यामुळे ‘ते वेगळे नाहीत’, असे म्हणणे चुकीचे आहे. मुसलमानांसाठी ‘पाकिस्तान’ एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झाले. ते धर्म किंवा राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने मुसलमान राष्ट्रच झाले; मात्र उर्वरित भारत हा एक धर्म आणि एक राष्ट्रीयत्व यांच्या आधारावर न झाल्यामुळे पूर्वीच्या अखंड भारतातील द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आजही देशाला भोवत आहे.

२. ८ कोटी मुसलमानांनी हिंदूंना हाकलणे आणि त्यांच्यावर अत्याचार करणे

ज्या ८ कोटी मुसलमानांसाठी पाकिस्तान निर्माण झाले, ते ८ कोटी मुसलमान, त्यांना मिळालेल्या स्वतःच्या आणि स्वतःसाठी असलेल्या त्या देशात एकत्र जमून राहिले का ? तसे झाले नाही. पूर्व बंगाल, सिंध, पश्चिम पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत या राज्यांत रहाणारे मुसलमान तेथेच राहिले; पण तेथील हिंदूंना मात्र हाकलून देण्यात आले, तसेच काहींना ठार मारण्यात आले. तेथील हिंदूंची घरेदारे लुटण्यात आली. स्त्रियांवर बलात्कार झाले, त्यांना ओढून नेण्यात आले. पळून येणार्‍या हिंदूंवरही सशस्त्र आक्रमणे झाली आणि त्यांनाही मोठ्या प्रमाणात कापून काढण्यात आले.

३. काँग्रेस सरकारच्या मुसलमानधार्जिण्या वृत्तीचा परिणाम !

पाकिस्तान झालेल्या प्रदेशाव्यतिरिक्त उर्वरित भारतातील मुसलमान येथेच राहिले. ज्यांच्यासाठी पाकिस्तान झाले, ते तेथे गेलेच नाहीत. त्यांना तेथे पाठवण्याचा विचारही काँग्रेसप्रणीत स्वराज्यात उत्पन्न झाला नाही आणि भारतातील उर्वरित मुसलमानांची लोकसंख्या वाढता वाढता आता सुमारे २० कोटी झाली आहे, म्हणजे १९४७ पूर्वीचीच स्थिती आता पुन्हा प्राप्त झाली असून मध्यंतरीच्या काळातील काँग्रेस सरकारच्या मुसलमानधार्जिण्या वृत्तीने हिंदूंना स्वधर्म अन् स्वराज्य यांपासून वंचित केले आहे.

४. डॉ. आंबेडकर यांचे मुसलमानांविषयीचे स्पष्ट विचार

डॉ. आंबेडकरांनाही गांधींचे एकराष्ट्रवादाचे विचार मान्य नव्हते. त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे. ‘‘या देशात हिंदु आणि मुसलमान हे २ समाज नव्हे, तर २ राष्ट्रे नांदत आहेत. हिंदी मुसलमान लोकांचा ओढा, मुसलमान संस्कृतीच्या राष्ट्रांकडे असणे अगदी स्वाभाविक आहे. हिंदुस्थान देश आपला आहे, याविषयी ज्यांना अभिमान नाही आणि त्यांतील निकटवर्ती हिंदु बांधवांविषयी ज्यांना आपलेपणा नाही, असे मुसलमान लोक मुसलमानी परचक्रापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यास सिद्ध होतील, असे धरून चालणे धोक्याचे आहे.’’ (‘पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया’ या पुस्तकातून (१९४०))

डॉ. आंबेडकर हे एक सूज्ञ विचारवंत आणि कसलेले राजनीतीज्ञ होते. मुसलमानांविषयीचे त्यांचे विचार अगदी सुस्पष्ट आहेत. डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ च्या दंगलीत हा अनुभव आपण घेतला आहे. मुसलमान आक्रमकांनी गेल्या हजार-बाराशे वर्षांत केलेले एकेक आक्रमण, म्हणजे भारताचा अपमान आहे.

५. ‘हिंदु धर्म नष्ट करणे, म्हणजेच धर्मनिरपेक्षता’ अशी सुशिक्षित लोकांची समजूत होणे

आम्हाला जी सत्ता सुमारे ६० वर्षे लाभली, ती त्याच मुसलमानधार्जिण्या काँग्रेसची ! मधल्या धर्मनिरपेक्षतेची नशा आमच्या देशातील सुशिक्षितांना एवढी चढवण्यात आली की, जणू ‘हिंदु धर्म नष्ट करणे, म्हणजेच धर्मनिरपेक्षता’, अशी त्यांची समजूत झाली. असल्या समाजवाद्यांची एक टोळी स्वतःला आणि एकमेकांना विचारवंत समजू लागली. हिंदु धर्माचा विचार करणारा क्षुद्र मनोवृत्तीचा, मागासलेला आणि बुरसटलेला ! हिंदुहिताचा विचार हा पक्षपातीपणा ! देवधर्म मानणे, हे अज्ञानाचे आणि अंधश्रद्धेचे लक्षण ! असे समजले जाऊ लागले.

(क्रमशः)

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे , चेंबूर, मुंबई

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

या पुढील लेख वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/814708.html