५४ वर्षांत ‘बेस्ट’च्या ९ सहस्र ६७७ गाड्यांची भंगारात विक्री

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – मागील ५४ वर्षांत ‘बेस्ट’च्या एकूण ९ सहस्र ६७७ गाड्यांची भंगारात विक्री करण्यात आली. यातून १८२ कोटी ६० लाख १८ सहस्र २८८ महसूल प्राप्त झाला, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी बेस्टच्या गाड्यांच्या विक्रीत मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप ९ जुलै या दिवशी विधानसभेत केला. यासंदर्भात वरील माहिती देत सरकारच्या वतीने उदय सामंत यांनी याविषयी चौकशी करण्याची घोषणा केली.

उदय सामंत म्हणाले, ‘‘सर्व गाड्यांची विक्री ई-लिलावाद्वारे धातू भंगार व्यापार महामंडळाकडून करण्यात आली. ई- लिलावाची सुविधा असलेल्या ३९ संस्था भंगार विक्रीच्या लिलावात सहभागी झाल्या होत्या. वर्ष २०१७ ते २०२४ या कालावधीत बेस्टच्या २ सहस्र ८३१ गाड्या भंगारात विकण्यात आल्या. त्यातून ८६ कोटी ८४ लाख ४० सहस्र ८२५ रुपये प्राप्त झाले.’’ यावर भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘‘चोरांना पाठीशी घालू नये. वर्ष १९७१ मध्ये ई-लिलाव होत नव्हता. भंगारविक्रीचा विषय केवळ बसगाड्यांपुरता मर्यादित नाही. सुट्या भागांचीही विक्री करण्यात आली आहे. या गाड्यांची विक्री नावे पालटून केवळ २ कंत्राटदारांना करण्यात आली.’’ यावर मंत्री उदय सामंत यांनी भंगार विक्री प्रक्रियेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करण्याची घोषणा केली.

भंगार गाड्यांमुळे क्रिकेट खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातहून बस मागवावी लागली ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

नुकताच टी-२० वर्ल्डकप जिंकणार्‍या भारतीय संघातील खेळाडूंचे मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यासाठीची मोठी बस गुजरातहून मागवली होती. बेस्टच्या गाड्या भंगार असल्यामुळेच गुजरातहून गाडी मागवण्यात आली.