‘ईश्वराचे (श्री गुरूंचे) साकार रूप आणि निराकार रूप म्हणजे काय ?’ याविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले स्पष्टीकरण

‘जेथे असे रूप आणि आकार व्यक्त ।
त्यास म्हणती ईश्वराचे सगुण साकार रूप ।। १ ।।

जेथे ना रूप ना आकार, ना त्रिगुणाला स्थान ।
तेव्हा तो ईश्वर असे निर्गुण निराकार ।। २ ।।

‘निराकार काय आहे ?’ हे समजून घेण्यासाठी आधी ‘आकार (साकार) म्हणजे काय ?’ आणि ‘निराकार म्हणजे काय ?’ यातील भेद समजून घ्यायला हवा, उदा. ‘गुरु ईश्वर आहेत’, हे जाणून गुरूंचे साकार आणि निराकार रूप समजून घेऊया.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. श्री गुरूंचे (ईश्वराचे) साकार रूप

रूप आणि आकार आले की, गुरु साकार होतात. गुरु साकार ईश्वर आहेत, म्हणजे गुरूंना रूप, तसेच दृश्य देह आहे. ते श्री गुरूंचे सगुण साकार रूप. श्री गुरूंचा स्थूलदेह, श्री गुरूंचे छायाचित्र, श्री गुरूंचे चलत्‌चित्र (व्हिडिओ) इत्यादी माध्यमांतून श्री गुरूंना अनुभवता येते.

सौ. मधुवंती पिंगळे

२. श्री गुरूंचे (ईश्वराचे) निराकार रूप

अ. जेथे श्री गुरूंचे रूप अथवा देह दृश्य स्वरूपात नसतो; पण श्री गुरूंना सर्व ठिकाणी अनुभवू शकतो, ते म्हणजे श्री गुरूंचे निराकार रूप ! जेव्हा प्रत्येक प्राणीमात्र, वृक्ष-वेली, चराचर, पंचमहाभूते आदी ठिकाणी आपण श्री गुरूंना अनुभवतो, तेव्हा ते त्यांचे निराकार रूप असते. थोडक्यात ‘जेथे स्थुलातून गुरूंचे रूप दिसत नाही, अशा चराचरांत ज्यांना श्री गुरूंच्या अस्तित्वाची अनुभूती येते, ते श्री गुरूंचे निराकार रूप होय.’

आ. तसेच धर्म, धर्मशास्त्र, धर्मसंस्कृती, श्री गुरूंची शिकवण इत्यादी ज्ञान हे श्री गुरूंचे स्वरूप असल्याने तेसुद्धा श्री गुरूंचे निराकार ‘निर्गुण ज्ञानरूप’ आहे.

इ. निर्गुण रूप हे श्री गुरूंचे त्रिगुणातीत स्वरूप असून ते गुणाश्रयी असते. श्री गुरूंच्या निर्गुण रूपात सत्त्व, रज आणि तम हे गुण शून्य असतात. सच्चिदानंद परब्रह्म हे श्रीमन्नारायण अवतार आहेत. त्रिगुणातीत असणार्‍यांवर त्रिगुणांचा प्रभाव नसतो. हे अवताराचे एक लक्षण आहे; परंतु देह असेपर्यंत अवतार जन्माच्या वेळी असलेल्या मूळ प्रकृतीनुसार वागणे बोलणे असू शकते. अवतारी कार्य करण्यास ते आवश्यकही आहे. त्यांच्या दिव्य इच्छेनुरूप आवश्यक त्या गुणाच्या माध्यमातून ते कार्य करतात. त्रिगुण त्यांचे दास, सेवक आहेत; म्हणून ते गुणाश्रयी आहेत.

– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

संग्राहक – आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू सेवाकेंद्र. (१९.१.२०२४)