‘२६.२.२०२३ या दिवशी अंबड (जिल्हा जालना) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. त्या वेळी गावातील हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी सभेच्या सेवेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
१. सभेच्या मंडपासाठी लागणारे साहित्य दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाने अल्प मूल्यात उपलब्ध करून देणे
सभेच्या मंडपासाठी लागणारे साहित्य गावातील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाने हिंदु जनजागृती समितीला अल्प मूल्यात उपलब्ध करून दिले. ध्वनी आणि विद्युत् व्यवस्था, मैैदान व्यवस्था, व्यासपीठ अन् प्रदर्शन व्यवस्था आणि मैदानात लागणारी पाण्याची व्यवस्था, तसेच सभेच्या प्रसारासाठी लागणारे उद्घोषणेचे साहित्यही त्यांनीच प्रयत्न करून उपलब्ध करून दिले.
२. दोन रिक्शाचालकांनी ४ दिवस गावात फिरून ध्वनीमुद्रकाद्वारे उद्घोषणा करण्याची सेवा अल्प मूल्यात करणे
सभेच्या निमंत्रणाची भित्तीपत्रके रिक्शावर लावण्यासाठी समितीचे कार्यकर्ते रिक्शाचालकांना भेटण्यासाठी गेले. हिंदु जनजागृती समितीचे साधक ऐकल्यावर ते रिक्शाचालक प्रभावित झाले. ‘सभेचा प्रसार होण्यासाठी गावात फिरून ध्वनीमुद्रकाद्वारे उद्घोषणा करणे’, ही सेवाही करायची होती. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या २ रिक्शाचालकांनी ‘आम्ही अल्प मूल्यात ही सेवा करू’, असे सांगितले आणि त्यांनी ४ दिवस उद्घोषणा करण्याची सेवा अल्प मूल्यात केली.
३. साधकांसाठी विनामूल्य भोजन उपलब्ध करून देणारे हितचिंतक श्री. नीरज दरक आणि श्री. हरि ओम गिल्डा !
श्री. नीरज दरक आणि श्री. हरि ओम गिल्डा या २ हितचिंतकांनी साधकांसाठी ७ दिवस दुपारचे अन् रात्रीचे भोजन विनामूल्य उपलब्ध करून दिले. त्या वेळी ‘त्यांच्या माध्यमातून श्री गुरूंनीच साधकांच्या भोजनाची काळजी घेतली’, असे आम्हाला जाणवले.
४. एका हितचिंतकाने साधिकांसाठी निवासाची खोली विनामूल्य उपलब्ध करून देणे
अन्य एका हितचिंतकाचे मोठे ‘लॉज’ (विश्रामगृह) आणि अभ्यासिका आहे. त्यांनी ३० जण राहू शकतील, अशी खोली समितीच्या साधिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली.
५. अन्य एका हितचिंतकाने समितीच्या साधकांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून दिली.
६. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाने सभेच्या प्रसारासाठी आपले दुचाकी वाहन उपलब्ध करून दिले.
७. अडचणी येऊनही गुरुकृपेनेच सभेपूर्वीची वाहनफेरी आणि सभा निर्विघ्नपणे अन् यशस्वीरित्या पार पडणे
या सभेचा प्रसार आणि नियोजन यांसाठी १५ साधक उपलब्ध होते, तसेच प्रसारासाठी केवळ एक आठवडा मिळाला होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सभेसाठी लागणारे सर्व अर्पण (सभेच्या व्ययासाठी लागणारे धन) केवळ ४ दिवसांत मिळाले. गुरूंच्या संकल्पशक्तीमुळे या सभेला २ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती होती. गुरूंच्या कृपेनेच सभेपूर्वीची वाहनफेरी आणि सभा यशस्वीरित्या पार पडली.
कितीही संकटे आली असता ।
पाठीराखा गुरुरूपी भगवंत ।
भक्ताला कशाची न तमा असावी ।।
‘आम्हा सर्वांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वरील ओळींप्रमाणे ‘याची देही याची डोळा’ अनुभूती दिली’, याबद्दल आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञ राहिलो, तरी ते अल्पच आहे.’
– हिंदु जनजागृती समितीचा एक साधक (जून २०२३)